बारा वर्षांनी शिवाला मिळाली मायेची ऊब

सुनील पांढरे 
शुक्रवार, 16 मार्च 2018

अंधारी - जन्मतः कचराकुंडीत टाकलेल्या मुलाला तब्बल बारा वर्षांनंतर आई-वडिलांची मायेची ऊब मिळाली. या अनाथ मुलाला पळशी येथील मूलबाळ नसलेल्या सुलोचना राऊत (वय ४०), देविदास राऊत (वय ४५) या दांपत्याने दत्तक घेतले आहे. यामुळे या अनाथ मुलाचा बारा वर्षांचा वनवास संपला आहे.

अंधारी - जन्मतः कचराकुंडीत टाकलेल्या मुलाला तब्बल बारा वर्षांनंतर आई-वडिलांची मायेची ऊब मिळाली. या अनाथ मुलाला पळशी येथील मूलबाळ नसलेल्या सुलोचना राऊत (वय ४०), देविदास राऊत (वय ४५) या दांपत्याने दत्तक घेतले आहे. यामुळे या अनाथ मुलाचा बारा वर्षांचा वनवास संपला आहे.

खडतर प्रवास
शिवाचा बारा वर्षांचा प्रवास अतिशय खडतर आहे. एखाद्या चित्रपटासारखी त्याच्या आयुष्याची कथा आहे. मुंबई-कसारा घाटातील शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास एक संत (साधू) दर्शनाला जात होते. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंडीतून रडण्याचा आवाज आला. त्यांनी कुंडीत पाहिले असता त्यांना नवजात अर्भक आढळले. त्या नवजात अर्भकाला सोबत घेऊन ते मुंबईला गेले. त्या संताने त्याला नऊ वर्षे सांभाळले. या नऊ वर्षात त्र्यंबकेश्वर (नाशिक), वेरूळ (घृष्णेश्‍वर), पंढरपूर या तीर्थस्थळांची दर्शनवारी घडवली. नऊ वर्षानंतर त्या संताने त्याला ‘तू आता तुझा उदरनिर्वाह करू शकतो, मला हिमालयाला जायचे आहे,’ असे सांगत त्याला मुंबई रेल्वेस्थानकावर सोडून ते निघून गेले. त्यानंतर शिवाने वर्षभर रेल्वेस्थानकावर कुलीचे काम केले. यादरम्यान त्याला त्र्यंबकेश्वरला जाण्याची इच्छा झाली. त्याने कमावलेल्या पैशातून एक सायकल विकत घेत, त्यावरून त्र्यंबकेश्वर गाठले. 

काही दिवस तो तेथे राहिला. नंतर सायकल विकून त्या पैशातून बसने वेरूळला आला. काही दिवस तेथे राहिला. काम मिळाले नाही म्हणून तेथून खुलताबादला आला.

खुलताबाद येथील जय भद्रा हॉटेलमध्ये कामाला राहिला. काम करीत असताना हॉटेलमालक संदीप बारगळ यांना त्याची जीवनकथा ऐकून गहिवरून आले. त्याच्या भवितव्याचा विचार करीत त्यांनी स्थानिक पोलिस व गल्लेबोरगाव (ता. कन्नड) येथील सिध्देश्वर महाराज यांच्या मदतीने हतनूर (ता. कन्नड) येथील श्रीकृष्ण महाराज यांच्या आश्रमात पाठविले. तेथील महाराज त्याचा मुलासारखा सांभाळ करू लागले.

संगीत, भजनांत पारंगत
शिवाला संगीतासह भजनांची आवड आहे. देविदास राऊत यांनाही संगीताची आवड आहे. बोधेगाव (ता. फुलंब्री) येथे वर्ष २०१७ मध्ये महाशिवरात्रीला भजन स्पर्धा ठेवण्यात आली होती. यात शिवाने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याच्यातील या कलेने देविदास राऊत यांच्या मनात घर केले. त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करून अनाथ शिवाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. तब्बल वर्षभर श्रीकृष्ण महाराज यांनी टाळाटाळ केली. परंतु राऊत दांपत्यानेही हट्ट सोडला नाही. अखेर रविवारी (ता. ११) या दांपत्याने शिवाला दत्तक घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raut family adopted child marathwada