काटे टोचल्यानंतर गुलाबी यश

नीला शर्मा
मंगळवार, 6 मार्च 2018

देशी गुलाबाच्या फुलांना आहार, औषध व सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेत ‘भाव’ मिळवून देणाऱ्या जयश्री यादव आणि त्यांच्या दोघी लेकींची संघर्षकथा थक्क करणारी आहे.

पुण्यातील जयश्री यादव यांनी दहा वर्षांमध्ये नवे आव्हान पेलत गुलाब प्रक्रिया उद्योगात आज जे यश मिळवले आहे, त्याचे त्यांना पूर्वी केवळ गृहिणी म्हणून ओळखणाऱ्यांना आश्‍चर्य वाटते. एवढेच नाही तर प्रक्रिया उद्योगातल्या कित्येकांना ही भरारी प्रेरणादायी वाटते. आयुर्वेदिक वनौषधींचे उत्पादन व प्रक्रिया उद्योग करायची इच्छा असणाऱ्या मैत्रिणीकडे जयश्रीताईंनी नोकरी करायची ठरविले होते. यासाठी दोघी जिल्हा उद्योग केंद्रात प्रशिक्षणासाठी गेल्या. व्यावसायिक आव्हानांचा अंदाज आल्यावर ते काम सुरू करणे मैत्रिणीला अशक्‍य वाटले; पण जयश्रीताईंनी ते धाडस केले.

त्या म्हणाल्या, ‘आधी गुलाबशेती करणाऱ्यांकडून आणि काही नातलगांकडून फुले घेऊन मी गुलकंद व गुलाबपाणी तयार करू लागले. नंतर आत्मविश्वास वाढला. गीतांजली आणि कश्‍मिरा या माझ्या मुलींनी मला त्या कामात खूप मदत केली. माझ्या भाच्याही सहकार्य करायच्या. यजमान कॉन्ट्रॅक्‍टर असल्याने ते त्यांच्या व्यापात असायचे; पण मला या व्यावसायासाठी त्यांनी पुरेपूर पाठिंबा दिला. आधी मला शेती, व्यापार, बॅंकांकडून त्यासाठी आर्थिक मदत मिळवणे, मार्केटिंग वगैरे काहीही माहीत नव्हते. टक्केटोणपे खात ते शिकले. आज गुलाबापासून वाइन तयार करून त्याचं पेटंट मिळवण्यापर्यंत घोडदौड झाली आहे. अनेक बचत गटांना आता प्रक्रिया उद्योगासाठी मार्गदर्शन करायला मला निमंत्रित केले जाते.’

जयश्रीताईंची धाकटी लेक कश्‍मिरा तर या उद्योगात पाय रोवण्यासाठी ऑस्ट्रेलियात अडीच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून आली. दोन वर्षांपूर्वी जयश्रीताईंबरोबर या दोघी लेकी तुर्कस्थानात गेल्या. गुलाबापासून तेल काढणाऱ्या एरा उद्योजकाकडून त्यांनी बरीच माहिती करून घेतली. तिथे कश्‍मिराने दीड महिना राहून याबाबतचे रीतसर प्रशिक्षण घेतले. गीतांजली ऑस्ट्रेलियात असते. ‘जयश्री प्रॉडक्‍ट्‌स’च्या गुलकंद, गुलाबपाणी, खस सिरप, आवळा कॅंडी, सिरप अन्‌ वाइन या उत्पादनांना विविध देशांमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यामगे तिचा मोठा वाटा आहे.

 ‘आम्ही पारंपरिक पद्धतीने वेलची व प्रवाळ या दोन स्वादांमध्ये गुलकंद बनवतो. त्यासाठी देशी गुलाब वापरतो. सेंद्रिय व दर्जेदार फुलांचा खात्रीशीर पुरवठा मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी खेड तालुक्‍यातल्या पाळू गावाजवळ दहा एकर जागा घेतली आहे. प्रक्रिया उद्योगासाठी चाकणला सध्या नातेवाइकांच्या जागेत काम चालते. अडचणी येत गेल्या; पण मार्ग सापडत गेले. एकातून दुसरे सुचत गेले. अथकपणे वाटचाल सुरू आहे. मला आणि माझ्या मुलींनाही काटेरी समस्यांपेक्षाही यशाच्या गुलदस्त्यात जमणाऱ्या फुलांचीच अपूर्वाई वाटते. आपला देशी गुलाब देशोदेशी सुगंध, चव, सौंदर्य व स्वास्थ्य वाढवणारा ठरो, हाच ध्यास आम्हा माय- लेकींना लागला आहे,’ असे जयश्रीताईंनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news women struggle story rose pune