मधमाशी पालनातील उपकरणांमुळे क्रांती

शब्‍दांकन - योगेश सारंगधर
सोमवार, 10 जुलै 2017

डॉ. बी. बी. वायकर (प्राणिशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)

डॉ. बी. बी. वायकर (प्राणिशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)

अतिप्राचीन काळापासून मधमाशापालन करण्याचे संदर्भ आहेत. पूर्वी मधमाशा पाळण्यासाठी माणूस मोठी मातीची मडकी, मोठ्या झाडांचे कोरलेले बुंधे, गवताच्या विणलेल्या टोपल्या, भिंतीच्या कपारी आदींचा वापर करीत असत. वसाहतीपासून मधमाशांना धुराने किंवा पेटत्या चुड्याने पोळ्यावरून पळवून लावत असत. पोळे तोडून काढून त्यातील मध पिळून काढत असत. मध काढताना मधमाशांचा सर्व पिलावळा नष्ट होतो. परिणामी, मधमाशा मोठ्या संख्येने मरत व वसाहत नष्ट होण्याची शक्‍यता फारच जास्त असते. यावर उपाय सापडत नव्हता. जगप्रसिद्ध संशोधक एल. एल. लेंगस्ट्रॉथ यांनी इटालियन जातीच्या मधमाशांच्या नैसर्गिक वसाहतीचा अभ्यास केला. या मधमाशा अंधाऱ्या जागी घरे बांधतात व सर्वसाधारणपणे ८ ते १० पोकड्या एकमेकांस समांतर बांधतात. प्रत्येक एक समांतर पोकडीत नऊ ते दहा मिलिमीटर अंतर असते. प्रत्येक पोकडीत एक तृतीयांश भागात मध साठवितात व खालच्या दोन तृतीयांश भागात अंडी, अळ्या व पिलावळा असतो. मधमाशा घरे बांधण्याच्या वैशिष्ट्यात कधीही बदल करीत नाहीत, ही त्याची स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन एल. एल. लेंगस्ट्रॉथ यांनी लाकडी पेटी व त्यातील चौकटीचा शोध लावला. त्यांना १८५२ मध्ये यूएस पेंटेंट ९३०० देण्यात आले. आज जगात या लाकडी पेटीला ‘लेंगस्ट्रॉथ बॉक्‍स’ या नावाने ओळखतात व त्यात थोडा बदल करून जगभर इटालियन जातीच्या मधमाशा पाळण्यासाठी वापरतात.

मधमाशी पालनातील उपकरणे
पेटीत मधमाशा पाळणे, त्याची नित्यनैमित्तिक तपासणी करणे, मध, मेण, पराग, विष, राजान्न व रोंगण काढणे इत्यादी कामे मधपाळाला सतत करावी लागतात. या सर्व कामासाठी योग्य, सुटसुटीत अशी अवजारे हळूहळू निर्माण करण्यात आली. त्याची माहिती पुढीलप्रमाणे -
मधुपेटी (Beehive) - आधुनिक मधमाशापालनात मधुपेटी हे सर्वांत महत्त्वाचे उपकरण आहे. मधमाशापालनात वापरल्या जाणाऱ्या भारतीय सातेळी व इटालियन मधमाशा अंधाऱ्या जागी व एकमेकांना समांतर अशी एकापेक्षा जास्त पोळी बांधतात. त्यांच्या या सवयीचा विचार करून मधपेटीची बांधणी केली जाते.

मधपेटीच्या विविध भागांची घडण अगदी काटेकोर मापे घेऊन केली जाते. मधुपेटी ठेवण्यासाठी जमिनीपासून ६ ते ९ इंच उंचीचे लाकडी किंवा लोखंडी अँगलचे चार पाय असलेले मधुपेटीच्याच आकाराचे स्टॅंड असावे लागते. त्यामुळे मातीतील ओलावा, मुंग्या व इतर कीटकांपासून मधमाशांचे संरक्षण होते; तसेच मधुपेटीतील हवा खेळती राहावयास मदत होते.

मधुनिष्कासन यंत्राचा १८६५ मध्ये शोध
इटलीत १८६५ मध्ये प्रसिद्ध संशोधक हृष्का यांनी लाकडी चौकटीतून पोळे न मोडता मध काढणारे मधुनिष्कासन यंत्राचा (Honey Extractor) शोध लावला. १८५७ मध्ये जॉन मेहरिंग यांनी मधुपेटीच्या चौकटीत वापरण्यात येणारे, मधमाशांच्या मेणापासून बनविलेले मेणपत्रे (Comb Foundation Sheet) याचा शोध लावला. या मेणपत्र्यामुळे मधुपोकड्यांचा भक्कमपणा वाढत असल्याने मधुनिष्कासन यंत्रातून पोकड्या वेगाने फिरविल्यानंतर पोकड्या न मोडता पोकड्यात साठविलेला मध बाहेर फेकला जातो व चौकडी परत परत वापरता येतात. १८७० मध्ये पाहणी करण्याअगोदर मधमाशांना शांत करण्यासाठी वापरता येणारे धुराडे शोधून काढले. वरील तीन शोधांमुळे मधमाशापालन व्यवसायात क्रांती झाली. मधमाशापालन व्यवसाय जगभर पसरला. जगभरत लोक आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने मधमाशापालन करू लागले.

भारतात १८८२-८३ दरम्यान मधमाशापालन पेटीत ठेवून मध काढण्यास सुरवात केली. १९१० मध्ये भारतीय सातळी मधमाशांसाठी लेंगस्ट्रॉथ बॉक्‍सप्रमाणेच; परंतु भारतीय सातेळी मधमाशांना उपयुक्त अशी लहान आकाराची लाकडी पेटी प्रथम फादर न्यूटन यांनी तयार केली व त्या पेटीला न्यूटन हाईन म्हणून ओळखतात. 

मधुपेटीचे विविध भाग खालीलप्रमाणे 
तळपाट (Bottom Board) - मधुपेटीच्या सर्वांत खालच्या भागाला तळपाट म्हणतात. तळपाटाच्या तीन बाजूंस कडेने लाकडी पट्ट्या मारलेल्या असतात व त्याच्या बरोबर मापात पिलाव्याच्या कोठीची चौकट बसते. ज्या बाजूस कडेची पट्टी नसते त्यालगतच राणी दरवाजा (क्वीन गेट) ठेवतात. त्यामधून फक्त कामकरी माशाच ये-जा करू शकतात. राणी व नर पेटीबाहेर पडू शकत नाहीत. तळपाट नेहमी स्वच्छ करत राहावे लागते.

पिलाव्याची कोठी (Brood Chamber) - तळपाटावर ठेवली जाणारी, चौरसाकृती, दोन्ही बाजूंनी उघडी पेटीसारखी चौकट यास ‘पिलाव्याची कोठी’ म्हणतात. या कोठीत चार, आठ किंवा दहा लाकडी चौकटी ठेवल्या जातात. या सर्व पोळे चौकटी प्रवेशद्वाराला काटकोन करून असतात. चौकटीची घडण काटेकोरपणे मापे घेऊन केलेली असते. 
 

पिलाव्याची चौकट (Brood Frame) - पिलाव्याच्या कोठीत मधमाशांना पिलावा वाढविता येण्यासाठी चौकटी असतात. भारतीय सातेळी माशांसाठी ८ चौकटी व इटालियन मधमाशांसाठी १० चौकटी असतात. भारतीय सातेळी मधमाशांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन चौकटी सलग ठेवल्यानंतर ८ मिलिमीटर व इटालियन मधमाशांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन चौकटी ठेवल्यानंतर ९ मिलिमीटर अंतर असते. हे अंतर दोन मधमाशा पाठीला पाठ लावून लगतच्या पोळ्यावरून फिरू शकतील इतकेच असते. यालाच इंग्रजीत बी स्पेस (माशी अंतर) म्हणतात. अंतर कमी असल्यास त्यांना फिरता येत नाही आणि राणीला योग्य अंडी घालता येत नाहीत. अंतर जास्त असेल तर एका पोकडीवरून दुसऱ्या पोकडीवर सहज जाता येत नाही. अंतर जास्त असल्यास मधमाशा दोन पोकड्या मेणाच्या साह्याने एकमेकास ठिकठिकाणी जोडतात. त्यामुळे मधमाशा एका पोकडीवरून दुसऱ्या पोकडीवर सहज जाऊ शकतात. अशा मेणाने जोडल्या गेलेल्या पोकड्यांना ‘संधी पोकड्या’ म्हणतात. प्रत्येक पोळे चौकट सहजासहजी स्वतंत्रपणे बाहेर काढता येत नाहीत. जोडलेल्या चौकटी स्वतंत्रपणे बाहेर काढताना तुटतात, मध बाहेर पडतो, मधमाशा; तसेच क्वचितप्रसंगी राणीही चेंगरून मरण्याची शक्‍यता असते; तसेच मधमाशाही चावऱ्या बनतात. त्यामुळे मधुपेटीच्या रचनेत माशीव्यापाला फार महत्त्व असते. मोळेचौकटीत माथा व तळ यांना समांतर दोन तारा असतात. या तारांना मेण फाउंडेशन शीट बांधतात. या मेणतावाच्या आधाराने कामकरी माशा कोठ्या बांधून पोळ्याची उभारणी करतात. याचा वापर मधमाशा अंडी घालणे व अन्नसाठा करणे, यासाठी करतात.

 खोट चौकट (Dummy Board) - पिलाव्याच्या कोठीत ठेवण्यासाठी पिलाव्याच्या चौकटीच्याच आकाराची एक फळी असते, तिला ‘खोट चौकट’ असे म्हणतात. मधुपेटीत पोळे चौकटी व कामकरी माशांची संख्या कमी असेल तर पिलाव्याच्या पेटीत विरळपणा येतो व त्यामुळे पेटीतील तापमान खाली घसरते. त्यामुळे पिलाव्याच्या वाढीवर परिणाम होतो. वसाहतीतील पोळे व मधमाशांची संख्या याप्रमाणे खोट चौकट पुढे मागे सारून वसाहतींना संरक्षण देता येतो.

 मधुकोठी (Super- Chamber) - पिलाव्याच्या कोठीवर त्याच लांबी रुंदीची व आकाराची; पण कमी उंचीची एक कोठी ठेवली जाते, तिला ‘मधुकोठी’ असे म्हणतात. कोठीतील मधुचौकटीत मधमाशा मध साठवितात. हाच मध उत्पन्न म्हणून मधपाळ स्वत-साठी ठेवतात. मधुकोठी फक्त मधाच्याच हंगामात वापरतात. मध जास्त साठत असल्यास एकापेक्षा जास्त मधुकोठ्या एकावर एक ठेवाव्या लागतात.

मधुचौकटी (Super Frame) - पिलाव्याच्या कोठीप्रमाणे मधुकोठीत ८ ते १० मधुचौकटी ठेवल्या जातात. या चौकटीत मधमाशा पोकड्या बांधतात आणि त्यांच्यात फक्त मधच साठवितात. 

  आंतर आच्छादन (Inner-Cover) - मधुपेटीवर पिलाव्याच्या कोठीवर ठेवण्यासाठी एक ते अडीच सेंटिमीटर जाडीची एक फळी असते, तिला ‘आंतर आच्छादन’ म्हणतात. आच्छादनास मध्यभागी ५ ते ५.७ सेंटिमीटर व्यासाचे छिद्र असते. त्यातून योग्य वायू विसर्जन होते व वसाहतीचे संरक्षणही होते.

 छप्पर किंवा बाहेरील झाकण (Roof) - पेटीचे सर्वांत वरचे झाकण. याला बाहेरून पत्रा मारलेला असतो; तसेच बाजूने जाळी मारलेली छिद्रे असतात. त्यातून उष्ण हवा बाहेर पडते.

राणी दरवाजा-क्वीन गेट (Queen Gate) - विवक्षित आकाराची भोके पाडलेला व लाकडी चौकटीस ठोकलेला पत्र्याचा तुकडा यातून फक्त कामकरी माशाच ये-जा करू शकतात. राणी माशी पळून (पेटीतून) जाऊ नये म्हणून तळपाट व पिलावच्या कोठीमधील फटीलगत राणी दरवाजा ठेवला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news Bee