बारा गुंठ्यांत मिरचीचे दीड लाखांचे उत्पन्न

गजानन आवारे
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

जायकवाडी - वरुडी बुद्रुक (ता. पैठण) येथील प्रगतिशील शेतकरी संजय दिलवाले यांनी शेतात इतर पिके न घेता  मिरचीची जून महिन्यात लागवड केली. जमीन हलकी असल्याने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून त्यांनी १२ गुंठे जमिनीतून अवघ्या पाच महिन्यांत दीड लाखांचे उत्पन्न मिळविले.

जायकवाडी - वरुडी बुद्रुक (ता. पैठण) येथील प्रगतिशील शेतकरी संजय दिलवाले यांनी शेतात इतर पिके न घेता  मिरचीची जून महिन्यात लागवड केली. जमीन हलकी असल्याने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून त्यांनी १२ गुंठे जमिनीतून अवघ्या पाच महिन्यांत दीड लाखांचे उत्पन्न मिळविले.

लागवडीपासून ६५ व्या दिवशी पहिली तोड केली. यामध्ये दिलवाले यांना १२ गुंठ्यांमधे सात क्विंटल उत्पादन मिळाले. पुढील प्रत्येक तोडीमध्ये उत्पादन वाढत गेले. आज अखेर त्यांनी एकूण ५ तोडी केल्या असून त्यामधून एकूण ५० ते ६० क्विंटल  हिरवी मिरची झाली असून अजून उत्पन्न सुरू आहे. उत्पादित माल त्यांनी पैठण व औरंगाबाद येथील बाजारात विक्री केला. तेथे त्यांना सरासरी भाव रुपये तीन हजार प्रतिक्विंटल मिळाला आहे. १२ गुंठे जमिनीतून जवळपास दीड लाखांचे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी त्यांना एकूण उत्पादन खर्च ३२ हजार रुपये आला आहे. कमी खर्चामधून जास्त उत्पादन कसे घ्यावे व वेळोवेळी येणाऱ्या अडचणींबाबत त्यांना कृषी सहायक संजय बेलदार व  रामेश्वर सुसे यांनी प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन केल्याचे शेतकरी दिलवाले यांनी सांगितले. 

मिरची पिकावर पडणारी फूलकीड ही मुख्य समस्या आहे. रोपांना शेणखताची स्लरी तयार करून आळवणी केल्याने जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत झाली. शेतीबाबत सकारात्मक विचार ठेवले तर कमी खर्चामधून जास्त उत्पादन घेता येते. नियोजन करताना आपले लक्ष्य निश्‍चित केले पाहिजे.
- संजय बेलदार, कृषी सहायक 

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे. पाणी, खत व्यवस्थापन वेळेवर केल्याने उत्पादनात वाढ होते. तसेच उत्पन्नही चांगले मिळते. परंतु, सध्या मजुरांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. कमी क्षेत्रावर शेती करून जास्त उत्पन्न घेण्यासाठी भाजीपाल्यामधील मिरची हे एक महत्त्वपूर्ण पीक आहे.
- संजय दिलवाले, प्रगतिशील शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news paithan farmer green chili