#FridayMotivation : जिद्दीने ती लिहतीय आयुष्याची यशकथा

सागर गिरमे
Friday, 13 March 2020

संधी मिळाली की पाय जमिनीवर ठेऊनच संधीचं सोनं करायला हवं. तनिष्का व्यासपीठामुळे माझी वेगळी ओळख निर्माण करू शकले. आधी कुटुंबातील व्यक्तींशीही बोलायला भीती वाटायची. आता कुटुंबात माझ्याशी आदराने वागतात. 
- मीनाक्षी सोनकटाळे

पुणे - ती जगायला पुण्यात आली. स्थिती हलाखीची, हातावरचं पोट. पदरी तीन मुली. पण आयुष्य बदलण्याची जिद्द मनात होती...तनिष्का व्यासपीठाने संधी दिली. सेविका ते शिक्षिका आणि आता यशस्वी व्यावसायिक होऊनही तिची जिद्द, कष्टातील सातत्य जराही कमी झालेलं नाही. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शिरूर तालुक्‍यातील वाबळेवाडीतील शाळेत सेविका म्हणून मीनाक्षी सोनकटाळे काम करीत होत्या. अशातच तनिष्का इंटरनेट साथी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वाबळेवाडी आणि परिसरातील सुमारे चार गावातील महिलांना इंटरनेटचं प्राथमिक शिक्षण देण्यास त्यांनी सुरवात केली. त्या स्वतःही इंटरनेट शिकत होत्या. या भागात गोधडी शिवून देणारं कुणीच नाही, याची जाणीव गावागावांत फिरताना झाली. गोधडी शिवण्याची प्राथमिक माहिती होती. यू ट्यूबच्या माध्यमातून विविध डिझाईन कशी करायची हेही शिकून घेतलं. त्यानंतर गावातून ऑर्डर मिळवल्या. रोज गोधडी शिवून देण्याची मागणी येऊ लागली. व्यवसाय वाढला. आणखी तीन महिलांना मीनाक्षीने रोजगार दिला आहे. 

त्यांच्या या कष्टाची दखल तनिष्का व्यासपीठाने घेतली. व्यवसायातील बारकावे समजण्यासाठी गुगलतर्फे दिल्लीमध्ये आयोजित स्टार्टअप एक्‍सलरेटर प्रोग्रॅमला जाण्याची संधी सोनकटाळे यांना दिली. व्यवसायाचा ओनामा मीनाक्षीने धडाक्‍याने केलाय. मीनाक्षी बीएड करतीय, वाबळेवाडीच्या प्रसिद्ध इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवते. भाड्याच्या घरात  राहताना स्वतःचं हक्काचं घर व्हावं म्हणून छोटी जागा घेतलीय. गोधड्या पोहचवण्यासाठी दुचाकी घेतली. मुलीसाठी लॅपटॉप घेतला. तीन मुलींच्या गुणांना उजळवत त्यांना उच्च शिक्षण देण्याचं स्वप्न ती बघतीय. शाळेने आत्मविश्‍वास, हिंमत दिली तर गोधडीने तिला आर्थिक ऊब दिलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minakshi sonkatale success story