'हिरे, माणकां'नी पालटलं शाळेचं रूप

प्रमोद जेरे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मिरज - साधारण 1973चा कालावधी असावा. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलला अनुदानित इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून मान्यता दिली. त्या वेळी महाराष्ट्रातील ही अनुदानित स्वरूपाची पहिली इंग्रजी शाळा ठरली. शाळेची सुरवातच दमदार झाल्याने स्थापनेनंतर काही वर्षे वाटचालही जोमात राहिली. आतापर्यंत किमान दोनशे नामवंत डॉक्‍टर, सोळा न्यायाधीश, शेकडो वकील, सैन्यातील शेकडो अधिकारी, हजारो उद्योजक शाळेने घडवले. शाळेतील राष्ट्रीय छात्र सेनेचा लौकिक देशभर पसरला.

पण जे बऱ्याच शिक्षण संस्थांमध्ये घडते ते याही शाळेबाबत घडले. शाळेच्या व्यवस्थापनातील मालकीचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. अजूनही तो कधीतरी डोके वर काढतो; पण त्यामध्ये शाळेचे अतोनात नुकसान झाले. गुणवत्तेपासून ते किमान सुविधांपर्यंत सगळ्या स्तरावर शाळा मागे पडली. अशा संघर्षमय वातावरणात शाळेच्या विकासाबाबत कोणी पुढे येणे अशक्‍यच. मिरजेतील डॉ. विनोद परमशेट्टी शाळेचेच विद्यार्थी. त्यांनी एकदा शाळेला भेट दिली. ज्या शाळेत आपण शिकलो, तिची बिकट अवस्था पाहून त्यांना रात्रभर झोप लागली नाही. मग त्यांनी ठरवले की शाळेचे चित्र बदलायचे. शाळेला जुना लौकिक आणि नवे रूपडे द्यायचे. त्यासाठी हवी होती व्यवस्थापनाची परवानगी. त्यांनी व्यवस्थापनासमोर पहिल्यांदाच एक गोष्ट स्पष्ट केली की, आमचा यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. शाळेच्या व्यवस्थापनात यायचे नाही. तुम्ही काय करताय त्याच्याशी यत्किंचितही देणे-घेणे नाही.

व्यवस्थापनानेही आधुनिकीकरणाला हिरवा कंदील दाखवला. कोणताही रोखीचा व्यवहार न करता माजी विद्यार्थ्यांनी परस्परच कामे सुरू केली. पहिले काम सभागृहाचे झाले. स्वतः डॉ. परमशेट्टी यांनी पुढाकार घेतला. सात लाख रुपये खर्चून आपल्या मातोश्रींच्या नावे पार्वतीबाई परमशेट्टी सभागृह उभारले. माजी विद्यार्थ्यांच्या वर्षनिहाय वेगवेगळ्या टीम्स बनवल्या. त्यांना वेगवेगळी कामे वाटून दिली. कोणी अद्ययावत प्रयोगशाळा दिली, कोणी खोल्यांचे नूतनीकरण केले. परदेशस्थ विद्यार्थ्याने प्रयोगशाळेतील अद्ययावत साहित्य पाठवले. कोणी ग्रंथालय अद्ययावत केले. अजूनही खूप कामे सुरू आहेत.

डॉ. परमशेट्टींच्या या कार्यासाठी डॉ. संजय व्हावळ, डॉ. विकास पाटील, बाबा आळतेकर यांच्यासारख्यांनी साथ दिली. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासाठी शाळेच्या प्रांगणात नुकताच बहारदार मेळावा झाला आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या हिरे-माणकांच्या खाणीस पुन्हा नवे चैतन्य प्राप्त झाले.

कामांचे ऑनलाइन वाटप
अलीकडे शाळा - महाविद्यालयांमधून होणारे माजी विद्यार्थ्यांचे मेळावे म्हणजे इव्हेंट झाले आहेत. शाळा महाविद्यालयनिहाय त्यासाठी वॉट्‌सऍप ग्रुपही बनतात. असाच ग्रुप न्यू इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनीही बनवला. त्यातूनच सभागृहाचे नूतनीकरण, प्रयोगशाळा, नव्या शाळाखोल्या, ग्रंथालय अशी कामे "ऑनलाइन' पद्धतीने वाटली गेली. अजूनही हा ग्रुप अशाच प्रकारे शाळेत आणखीही सुधारणांसाठी सक्रिय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: miraj news aai parvati sabhagrah school education