कुरियर बॉय ते ख्यातनाम चित्रकार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मला खूप आनंद होत आहे की, ललित कला अकादमीचा मानाचा पुरस्कार मला मिळाला. मला जास्त आनंद या गोष्टीचा होतोय की, मी महाराष्ट्रासाठी हा पुरस्कार मिळवला आहे. तरुण कलाकारांना माझे हे सांगणे आहे की, मेहनत करा, त्याचे फळ तुम्हाला मिळणार, कला अर्धवट सोडू नका. 
- विक्रांत भिसे

विक्रोळी - जिद्द, आत्मविश्‍वास, प्रखर मेहनत, संयम या विशेष गुणांचा प्रत्यक्ष जीवनात वापर केल्याने काय होऊ शकते, हे विक्रांत भिसे या चित्रकाराने जगाला दाखवून दिले आहे. पोट भरण्यासाठी कुरियर बॉय म्हणून नोकरी करणाऱ्या या तरुणाने राष्ट्रीय स्तरावरील चित्रकार अशी झेप घेतली आहे.

विक्रोळीत राहणाऱ्या विक्रांत भिसे यांना राष्ट्रीय स्तरावर मानाचा गणला जाणारा ललित अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची नुकतीच दिल्लीत घोषणा करण्यात आली. ‘इम्प्रेशन’ या त्यांच्या कलाकृतीची निवड झाली आहे. यंदा या पुरस्काराने सन्मानित झालेले विक्रांत हे महाराष्ट्रातील एकमेव कलाकार आहेत.

भिसे यांना लहानपणापासूनच चित्रकलेचे वेड होते. अभ्यासात लक्ष कमी आणि सगळ्या वह्या-पुस्तकांवर फक्त चित्र काढणारा विद्यार्थी, अशी त्यांची ओळख होती. शालेय शिक्षणानंतर पोटापाण्यासाठी कुरिअरची नोकरी आणि सायंकाळी रात्र महाविद्यालय असे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान त्यांचे काका प्रकाश भिसे यांनी त्यांच्यातला कलाकार ओळखून त्यांना मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट येथे जाण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी रहेजा स्कूल ऑफ आर्ट व जे. जे. स्कूल मधून चित्रकलेचे धडे घेतले. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी फ्रीलान्स वर्क सुरू केले. नवी मुंबईतील न्यू होरायझन स्कॉलर्स या शाळेत आर्ट फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news courier boy artist vikrant bhise