esakal | प्रेरणादायी मनोजची सामाजिक "जाणीव' 
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेरणादायी मनोजची सामाजिक "जाणीव' 

प्रेरणादायी मनोजची सामाजिक "जाणीव' 

sakal_logo
By
भक्ती परब

मुंबई - स्वतः अनाथाश्रमात वाढलेल्या मनोज पांचाळचा आजवरचा प्रवास आणि अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. तरुण वयात वेगळे काही करण्याची ऊर्मी असते. नेमक्‍या याच वळणावर मनोजने आगळीवेगळी सामाजिक "जाणीव' निर्माण करून माणुसकीची हाक दिली आणि हातही. अलीकडे आपल्या नात्याच्या, जवळच्या माणसांना अनाथाश्रमात किंवा स्मशानात सोडून येणारी माणसे पाहिली की मनोजसारखे काम करणाऱ्या अनेक हातांची गरज आहे, याची खात्री मनोमन पटते. 

मूळचा नांदेडमधील छोट्याशा गावातील असलेला मनोज मुंबईत नोकरीसाठी आला; पण त्याची वाट इतरांसारखी सरधोपट नव्हती. मनोज ऑफिसला जाताना आजूबाजूला जेव्हा म्हातारी, आजारांनी ग्रासलेली, रस्त्यावर बेवारशासारखी हिंडणारी, कुठेतरी नजर लावून आडोशा कोपऱ्यात खितपत पडलेली ज्येष्ठ मंडळी दिसायची. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या डोक्‍यात आला आणि अशा माणसांना घरातून जेवण नेऊन द्यायला मनोजने सुरवात केली. काही काळानंतर त्याने आपल्या या समाजकार्यात मित्रपरिवार जोडला. "जाणीव' नावाचा आश्रम सुरू केला आणि माणुसकीची जाणीव करून देणाऱ्या समाजकार्याला सुरवात केली. 

डोंबिवलीतील पूर्वेला मानपाडा महामार्गाजवळ सोनारपाडा भागातील माळरानावरील जागेत "जाणीव' आश्रम वसला आहे. ही जागा आता ज्येष्ठांचे आपुलकीचे घर झाली आहे. मनोजची पत्नी आणि दोन मुलेही याच आश्रमात आजी-आजोबांसोबत राहून त्यांची सेवाशुश्रुषा करतात. त्यांना जशी गरज असेल तशी आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना वाचायला पुस्तके, वर्तमानपत्रे दिली जातात. सकाळी नियमित योग करवून घेतला जातो. त्यांच्यासाठी आश्रमाच्या बाजूला मोकळी जागासुद्धा फेरफटका मारण्यासाठी राखून ठेवली आहे. इथे राहणाऱ्या आजी-आजोबांची मोफत सोय केली जाते. 

आश्रयदाता आणि प्रेरक वक्ता 
मनोजने "जाणीव आश्रमा'सोबतच अचिव्हर्स प्रा. लि. या कंपनीची स्थापना करून समाजकार्यात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. डॉक्‍टर, पोलिस, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरक व्याख्याने तो देतो. जीवन किती सुंदर आहे, हे तो त्यांना पटवून देतो. समुपदेशन करतो. वंचित घटकांच्या मुलांसाठी तो शैक्षणिक उपक्रम राबवतो. निराधार वृद्ध, आदिवासी, तृतीयपंथी, विनाकारण कारागृहात कैद असलेल्या व्यक्तींसाठी तो गेले पाच वर्षे निष्ठापूर्वक सामाजिक कार्य करीत आहे. या कामासाठी त्याला काही पुरस्कारही मिळाले आहेत. मनोजचे कार्य फक्त मुंबईपुरते मर्यादित नसून महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यभर पसरले आहे. 

लहान असताना रस्त्यावर, बसस्थानकात आजी-आजोबांचे होणारे हाल मी पाहिले होते. मला त्या वेळेस त्यांच्यासाठी खूप काही करायचे होते; पण ते जमले नाही. कारण मी शाळेत होतो. पण त्या वेळेस ठरवले की जेव्हा मी माझ्या दोन वेळच्या भाकरीची सोय करीन, तेव्हा अशा आजी-आजोबांसाठी काम करीन, ज्यांच्या आयुष्याची फरपट होत आहे त्यांच्यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून मी हे सामाजिक कार्य करत आहे.

loading image
go to top