बसोलीच्या कलावंतांनी साकारले अनोखे भित्तिचित्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - कलेच्या अंगी दुःख निवारण्याची अद्‌भुत शक्ती असते. असंख्य सकारात्मक स्पंदनांची निर्मिती तुटलेल्या हृदयाची सहज पुनर्बांधणी करू शकते आणि निराश जीवनात चैतन्य भरू शकते. याच संकल्पनेवर आधारित अनोखे भित्तिचित्र साकारण्याची किमया बसोलीच्या कलावंतांनी दोन महिन्यांच्या परिश्रमातून केली आहे.

नागपूर - कलेच्या अंगी दुःख निवारण्याची अद्‌भुत शक्ती असते. असंख्य सकारात्मक स्पंदनांची निर्मिती तुटलेल्या हृदयाची सहज पुनर्बांधणी करू शकते आणि निराश जीवनात चैतन्य भरू शकते. याच संकल्पनेवर आधारित अनोखे भित्तिचित्र साकारण्याची किमया बसोलीच्या कलावंतांनी दोन महिन्यांच्या परिश्रमातून केली आहे.

भारतीय संस्कृतीच्या रूपांतराचे प्रतीक म्हणजे हे भित्तिचित्र होय. पूर्वेकडील देश भारत आणि त्याच्या तत्त्वांचे पाश्‍चिमेत म्हणजेच चंद्राच्या देशात होणारे रूपांतरण, ही या भित्तिचित्राची मूळ संकल्पना आहे. ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्यासोबत अख्खे आयुष्य बसोलीतील चिमुकल्यांसाठी खर्ची करणाऱ्या त्यांच्या पत्नी स्व. माधुरी चन्ने यांचे कलात्मक स्मरण करण्यासाठी या भित्तिचित्राची निर्मिती केली.

शापित यक्ष प्रेयसीला मेघांच्या माध्यमातून प्रेमसंदेश पाठवतो. रामगिरी पर्वत ते अल्कानगरी हा या मेघांच्या प्रवासाचा मुख्य प्रवाह. भारत व पाश्‍चिमात्य देशातील हा संदेश प्रवास आणि नंतर त्याचे पक्षी, फुलपाखरू व देवदूत असे रूपांतर होऊन पाश्‍चिमात्य देशात तो आदर्श संदेश पोहोचतो. पूर्व मेघ ते उत्तर मेघ या संकल्पनेच्या आधारावरील या भीत्तिचित्रात भारतीय वैदिक आणि इतर सर्व धर्मप्रतीकांचा वापर केला आहे. 

मोर, कबुतर, सूर्य, चंद्र, मेघ, केळीची झाडे, बोधिवृक्ष, भारतीय शेती घटक, वास्तुरचना आणि प्राचीन परंपरेच्या संदेशप्रणालीतील मनुष्य प्रतिमांचाही वापर केला आहे. ज्या रुग्णालयाने स्व. माधुरी चन्ने यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये पूर्णवेळ सेवा केली, त्याच ठिकाणी ही भीत्तिचित्रे स्थिरावली आहेत. 

मेघदूत या संदेश काव्यावरून आखणी
भारतीय जीवनमूल्य, पद्धती आणि पाश्‍चिमात्य पद्धती अशा दोन भागांमध्ये या भित्तिचित्राची विभागणी केली आहे. चुना, पिवळी माती, गेरू यासारख्या जमीनसादृश भारतीय रंगसंगतीत तर निळा, हिरवा, पिवळा या रंगांच्या फिकट छटेतील पाश्‍चिमात्य रंगसंगतीमधून हा फरक स्पष्ट बघायला मिळतो. महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या संदेशकाव्यावरून या भित्तिचित्राची आखणी केली गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news vidarbha news Murals basoli art