पिलाणीतील प्राजक्ताची सुवर्णपदकाला गवसणी

सुनील शेडगे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

नागठाणे - पिलाणी या डोंगरउंचावरच्या गावातील प्राजक्ताने राष्ट्रीय शालेय खेळाच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. वेटलिफ्टिंगमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखविताना तिने हे यश संपादन केले.

नागठाणे - पिलाणी या डोंगरउंचावरच्या गावातील प्राजक्ताने राष्ट्रीय शालेय खेळाच्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. वेटलिफ्टिंगमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखविताना तिने हे यश संपादन केले.

पिलाणी हे सातारा तालुक्‍यातील डोंगरउंचावरील गाव. प्राजक्ता मधुकर साळुंखे ही या गावातील रहिवासी. आरंभीच्या काळात गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाली. सध्या ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिकते. आरंभीपासून तिला खेळाची आवड. त्यातून ती वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकाराकडे वळली. मुळात मुलींसाठी हा काहीसा अनोळखी खेळ. असे असताना प्राजक्ताने मोठ्या जिद्दीने त्यातील तंत्र, नैपुण्य अवगत केले. 

शाळेतील शिक्षक जितेंद्र देवकर व श्री. पवार यांचे विशेष मार्गदर्शन तिला लाभले. कुटुंबीयांचेही मोठे पाठबळ तिच्या पाठीशी कायम राहिले. त्यातून आसाममधील गुवाहटी येथे नुकत्याच खेळवण्यात आलेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेत प्राजक्ताने १७ वर्षांखालील वयोगटात व ५४ ते ६३ किलो वजनी गटात डीन व जर्क या दोन प्रकारांत मिळून तब्बल १५४ किलो वजन उचलले. या कामगिरीमुळे ती देशातील स्पर्धकांत अव्वल येऊन सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

शाळेतर्फे प्राजक्ताचा गौरव
प्राजक्ताचे हे यश तिच्या प्राथमिक शाळेसाठी अभिमानाचा विषय ठरले. त्यामुळेच शाळेच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बंडोबा ढाणे, संजय शिंदे, विश्वास कवडे, शिवाजी भोसले या शिक्षकांनी तिचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagthane news prajakta salunkhe gold medal in weight lifting