बांगडी व्यवसायातून शेतीच्या दिशेने... 

सुदर्शन सुतार
सोमवार, 22 मे 2017

घरची परिस्थिती बेताची. पती शेतमजूर, दोन मुले, एक मुलगी. कुटुंबाचा आर्थिक भार, मुलांचं शिक्षण, या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी बांगडी व्यवसाय सुरू केला. आज महिन्याकाठी पाच ते सात हजारांची कमाई त्या करतात. बांगडी व्यवसायावर त्यांनी साडेसहा एकर शेती घेतली. छोटा व्यवसाय असूनही एका महिलेची धडपड, जिद्द कशी असू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील नजमून शफी शेख. 

नजमून शफी शेख यांचे सासर अणदूर (ता. तुळजापूर), पण लग्नानंतर त्या माहेरी बोरामणीलाच राहायला आल्या. त्यांच्या आईदेखील बांगडी व्यवसायात होत्या. लहानपणापासून आईबरोबर बांगड्या भरायला जात असल्याने आपसूकच बांगडी व्यवसायाची पूर्ण माहिती आणि चांगला हातखंडा होता. त्यामुळे पती शफी यांना आर्थिक साथ देण्यासाठी त्यांनी बांगडी व्यवसाय सुरू केला. साधारण वीसेक वर्षांपूर्वीची ही घटना. बांगडी व्यवसायातूनच त्यांनी सैपन, गौस आणि मुलगी मुमताज यांचे शिक्षण पूर्ण केले. तिघांची लग्ने करून दिली. तीनही मुले आपापल्या संसारात स्थिर आहेत. नजमून शेख यांचा स्वभाव बोलका आणि सगळ्यांना ताई, काकू, भाभी म्हणत बांगडी भरण्याचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे बायकांचा सर्वाधिक ओढा आहे. त्यामुळेच केवळ बोरामणीच नव्हे तर नजीकच्या वाड्या, वस्त्यांवरूनही बायका त्यांच्याकडे बांगड्या भरण्यासाठी येतात.

महिन्याला दीडशे डझन बांगड्यांची विक्री
नजमून शेख यांच्याकडे फॅन्सी, प्लेन, मुडई, चमकी अशा विविध प्रकारच्या बांगड्या विक्रीस असतात. साधारण फॅन्सी बांगड्या ८० रुपये, प्लेन ३० रुपये, मुडई ७० रुपये आणि चमकीच्या ७० रुपये डझनप्रमाणे त्या बांगड्या भरतात. महिन्याकाठी सुमारे दीडशे डझन बांगड्यांची त्या विक्री करतात. बांगडी व्यवसायातून त्या दरमहा साडेसात हजारांची कमाई करतात. लग्नसराईच्या हंगामात हीच विक्री महिन्याकाठी तीनशे डझनावर पोचते. त्या वेळी मिळकतही दुप्पट होते. त्यातून खर्च वजा जाता पाच ते सात हजार रुपये त्या मिळवतात.

लग्नकार्यांत सर्वाधिक मागणी
बोरामणी तसेच परिसरातील तांदूळवाडी, मोहोळकर तांडा आदी गावच्या लग्नकार्यातील बांगड्यासाठी शेख यांच्याकडे सर्वाधिक बांगडी भरण्याची मागणी असते. मुळातच बांगड्यातील विविधता, गुणवत्ता यामुळे त्यांच्याकडे बांगड्या भरण्यासाठी बहुतेक कार्यप्रमुख पसंती देतात. लग्नाशिवाय, मुंज, बारसे यांसारख्या विविध कार्यक्रमांनाही त्यांना बोलावणे असते. 

सौंदर्य प्रसाधने आणि  स्टेशनरी व्यवसाय 
बांगड्या भरण्याच्या व्यवसायाबरोबर नजमून शेख सौंदर्य प्रसाधने आणि स्टेशनरीची विक्री करतात. त्यात अगदी लहान मुलींच्या बांगड्या, टिकल्या, नेलपॉलिश, मेंदी कोन यासह मंगळसूत्र, अंगठ्या, पैंजन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या व्यवसायातूनही त्या महिन्याकाठी दोन-अडीच हजार रुपये जास्तीचे मिळवतात. विशेषतः सणवारामध्ये या साहित्याला सर्वाधिक मागणी असते. घरी बांगड्या भरताभरता वाढत्या मागणीमुळे गावातही त्यांनी एक दुकान थाटले.

 त्या बनल्या स्वच्छतादूत 
नजमून शेख या गावात आणि परिसरातील अनेक कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करतात. गावातील ‘सकाळ' तनिष्का गटाच्या गटप्रमुख सौ. अनिता माळगे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे काम आणखी जोमाने केले. त्या स्वतः तनिष्का सदस्य आहेत. त्यानंतर या कामासाठी त्यांनी चांगला पुढाकार घेतला, आज या परिसरात नजमून शेख स्वच्छतादूत म्हणूनच काम करतात.

शेती घेतली, पशुपालनाचे ध्येय...
काही वर्षांपूर्वीच नजमून शेख यांनी बांगड्यांच्या व्यवसायातून आर्थिक बचत करीत साडेसहा एकर शेती घेतली. या शेतीत पुरेसे पाणी आहे. सध्या घरच्यापुरते धान्य त्या पिकवतात; पण याही पुढे जाऊन त्या आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय करणार आहेत. यादृष्टीने मोठा मुलगा सैपन त्यासाठी प्रयत्न करीत आहे. बांगडी व्यवसायापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास येत्या वर्षात प्रगतिशील शेतकरी म्हणून परिपूर्ण होणार आहे.

नजमून शेख  - ९५९५०६०२०२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Najmoon Shafi Sheikh story