आगीच्या तांडवातील त्या "बेघर' कुटुंबीयांना खाकी वर्दीने दिला हात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जुने नाशिक - दहा दिवसांपूर्वी घासबाजार (भीमवाडी) परिसरात लागलेल्या आगीच्या तांडवात पाच ते सहा जणांचे संसार बेचिराख झाले... क्षणात सारं काही होत्याचं नव्हतं झालं... ते बेघर झाले आणि जळालेल्या संसाराच्या ढिगाऱ्याजवळ बसून हताश नजरेने "कुणी' मदतीला येईल का, याकडे डोळे लावून बसले. "सकाळ'ने त्यांच्या व्यथा, वेदना वृत्ताद्वारे प्रसिद्ध करत त्यांना भक्कम साथ दिली. यासंदर्भातील वृत्ताची खाकी वर्दीने दखल घेतली आणि जागी झाली त्यांच्यातील माणुसकी... थेट भीमवाडी गाठत या खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांनी इतरांच्या साथीने मदत मिळवत अशा बेघर कुटुंबीयांना आपल्या दातृत्वाची चुणूक दाखवली.

जुने नाशिक - दहा दिवसांपूर्वी घासबाजार (भीमवाडी) परिसरात लागलेल्या आगीच्या तांडवात पाच ते सहा जणांचे संसार बेचिराख झाले... क्षणात सारं काही होत्याचं नव्हतं झालं... ते बेघर झाले आणि जळालेल्या संसाराच्या ढिगाऱ्याजवळ बसून हताश नजरेने "कुणी' मदतीला येईल का, याकडे डोळे लावून बसले. "सकाळ'ने त्यांच्या व्यथा, वेदना वृत्ताद्वारे प्रसिद्ध करत त्यांना भक्कम साथ दिली. यासंदर्भातील वृत्ताची खाकी वर्दीने दखल घेतली आणि जागी झाली त्यांच्यातील माणुसकी... थेट भीमवाडी गाठत या खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांनी इतरांच्या साथीने मदत मिळवत अशा बेघर कुटुंबीयांना आपल्या दातृत्वाची चुणूक दाखवली. एवढेच नव्हे, तर त्यांचा संसार उभा राहण्यासाठी भरीव मदत केली. "त्या' बेघरांचा संसार उभा राहिल्याने असू आणि हसूही पाहायला मिळाले. 

समाजात "साथी हात बढाना' अशी म्हण प्रचलित आहे. कुणाकडून त्याचा अंगीकार केला जातो, तर कुणाकडून नाही. भीमवाडी झोपडपट्टीतील घरांना लागलेल्या आगीची घटना भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी लक्षात घेत प्रचलित म्हणीस अस्तित्वात आणण्याचे कार्य केले. अचानक लागलेल्या आगीमुळे बघता-बघता पाच कुटुंबांचा संसार खाक झाला. या घटनेला दोन दिवस उलटूनही पीडित कुटुंबीयाना कुणाच्या मदतीचा हात मिळाला नाही. हे सारेजण संसाराच्या जाळालेल्या अवशेषासह मदतीची वाट पाहत होते. त्यांच्या कुटुंबीयांची कैफियत "सकाळ'ने मांडली. त्यानंतर मंगलसिंग सूर्यवंशी यांनी समाजातील दानशूर व्यक्ती असलेले अशोक पंजाबी, अशोक भुतडा, सतीश आमले यांची भेट घेत या पीडित कुटुंबाला मदत करत त्यांचा संसार उभा करण्याची कल्पना मांडली. 

दातृत्वाची अनोखी प्रचीती 
श्री. पंजाबी, भुतडा व आमले यांनीही आपापल्यापरीने मदत केली. श्री. पंजाबी यांनी घरे तयार करण्यासाठी लागणारे पत्रे दिले. श्री. भुतडा यांनी भांड्यांसह विविध संसारोपयोगी वस्तू, तर आमले यांनी धान्य दिले. भद्रकाली पोलिसांनी मिळालेल्या साहित्यातून नवीन घरांची उभारणी केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि मदतकर्ते यांच्या हस्ते संसारोपयोगी वस्तू देऊन नवीन संसार थाटण्यास मदत केली. खाकीत फक्त कायदा सुव्यवस्थाच असते, असे नाही. तर माणुसकीही असते, हे भद्रकाली पोलिसांनी दाखवून दिले. 

पोलिसांचे कायमच ऋणी 
पीडित कुटुंबीयांनी कुणी आमच्या मदतीला येणार, याची आशा सोडून दिली होती. पण आज पुन्हा आम्हाला आमचे घर मिळाले. तेही पोलिस आणि या दानशूर व्यक्तींमुळे आम्ही नेहमीच यांचे ऋणी राहू, अशा प्रतिक्रिया पीडितांनी व्यक्त केली. या वेळी पोलिस उपायुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, अजय देवरे, नगरसेविका शोभा साबळे, सुफी जीन, मीर मुक्तार अशरफी, "भ्रमर'चे संपादक चंदुलाल शाह, श्री. भालेराव आदी उपस्थित होते. 

कुटुंबच कुटुंबाची मदत करू शकते. आगेच्या घटनेनंतर पोलिसांकडून नवीन संसाराची मिळालेली मदत मायेची ऊब देणारी आहे. 
संगीता पाईकराव, पीडित महिला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news fire police positive story