#NavDurga नगरची ‘लेडी सिंघम’

नीला शर्मा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

नगर परिसरातील वाळू तस्करांच्या प्रतिबंधासाठी बुलेटवरून अचानक जाऊन केलेल्या कारवाईमुळे उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना लोक ‘लेडी सिंघम’ म्हणू लागले आहेत. 

निष्ठेने जबाबदारी पेलताना ही तरुणी प्रसंगी रणरागिणी होते. मागासवर्गीयांना शाळाप्रवेशासाठी जातीचे दाखले, जमिनीच्या वादाची प्रकरणं आदी संदर्भात ती गरजूंना कमालीच्या सहृदयतेनं वागवते. उज्ज्वला कुंडलिक गाडेकर या तरुणीचं चौफेर कर्तृत्व समाजात नवचैतन्य आणणारं आहे. पुण्याची ही लेक नगरसारख्या संवेदनशील भागात उमेदीनं कामगिरी बजावत आहे. 

त्या म्हणाल्या, ‘वाळूतस्करी संदर्भात गेल्या वर्षभरात अनेक कारवाया मी आणि सहकाऱ्यांनी केल्या. त्यांपैकी एका ठिकाणी चारचाकी वाहन जाणं अशक्‍य म्हणून मी आणि माझी एक सहकारी, दोघीच बुलेटवरून अचानक जाऊन कारवाई केली. आणखी एकेठिकाणी वाळू होडीत भरून पळवली जाणार होती. आम्ही स्फोट घडवून ती होडी फोडली. वाळू नेऊ दिली नाही.’

उज्ज्वला पुढे म्हणाल्या, ‘मी दापोडीत लहानाची मोठी झाले. माझे वडील ॲम्युनिशन फॅक्‍टरीत कामगार आहेत. त्यांना आपली लेक डेप्युटी कलेक्‍टर झाली म्हणजे नेमकं काय, हे लक्षात येत नव्हतं. राहुरी कृषी विद्यापीठातून मी बीएस्सी (ॲग्रिकल्चर) झाले. स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात पीएसआय झाले. दुसऱ्या प्रयत्नात विक्रीकर अधिकारी. मुंबईला पोस्टिंग झालं तेव्हा मुंबई - पुणे प्रवासात अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात उपजिल्हाधिकारी झाले. कुठलाही क्‍लास न लावता, चिकाटीनं अभ्यास करत राहिले.’

ब्रिटिश काळात जमिनीचे हक्क दिले गेलेल्या कुटुंबांतील वारसाहक्काचा वाद, जमिनीबाबत वर्षानुवर्षे चिघळत पडलेली प्रकरणं हुशारीनं त्यांनी निकाली लावली आहेत. मतदान प्रक्रियेत बूथ हाताळणाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत दोन तोतयांचा छडा लावत त्यांनी कारवाईचा दणका दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NavDurga Lady SIngham Ujjawala Gadekar Motivation