जयंती गणेशाची, सेवा गरजू निराधारांची

सुधाकर काशीद
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - वाद्यांचा दणदणाट, शक्तिप्रदर्शन करणारी मिरवणूक, दिव्यांचा लखलखाट, केवळ मंडपावर लाखाच्या पटीत खर्च, यातले काही न करताही गणेश जयंती साजरी करता येते व यानिमित्ताने धनगरवाड्यातील ४०० मुलांना कपडे, पंधरा कुटुंबांना सर्व संसारोपयोगी साहित्य, तीन निराधार कुटुंबांना वर्षभर पुरेल एवढे धान्य देता येते, हे न्यू शिवनेरी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. 

गणेश जयंतीनिमित्त या मंडळाने अनोख्या गणेश जयंती सोहळ्याची परंपरा जपली आहे. धार्मिक उत्सव म्हणजे देवाऐवजी संपत्तीचेच दर्शन, या अलीकडच्या काळातील वाढत्या प्रथेला त्यांनी जाणीवपूर्वक फाटा दिला आहे. 

शुक्रवार पेठ जैन मठाजवळ हे तरुण मंडळ आहे. सर्व कार्यकर्ते मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांच्याकडे समाजाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. या कार्यकर्त्यांचे श्री गणेश हे आराध्य दैवत आहे. त्यांनी श्रमदानातून गणेश मंदिर बांधले आहे. दरवर्षी ते गणेश जयंती साजरी करतात; पण या धार्मिक सोहळ्याचे निमित्त करून गोरगरीब वंचितांना भरभरून मदत करतात. यावर्षी जिल्ह्याचे पश्‍चिम टोक असलेल्या अणुस्कुरा घाटाजवळील ११ वाड्यावस्तीवरील ४०० मुलांना त्यांच्या वतीने कपडे जोड देण्यात येणार आहे. याबरोबरच गगनबावडा तालुक्‍यातील शेळोली या धनगरवाड्यातील ११ कुटुंबांना सर्व प्रापंचिक साहित्य देण्यात येणार आहे. 

याशिवाय शुक्रवार पेठेतील महिला ज्यांना कोणताही आर्थिक आधार नाही, पण त्या काबाडकष्ट करून कुटुंब चालवतात. अशा तीन महिलांना वर्षभर त्यांच्या कुटुंबाला पुरेल एवढे धान्य भरून दिले जाणार आहे. तसेच महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयाच्या नेत्र विभागास एक नेत्र तपासणी उपकरण व शस्त्रक्रिया दालनातील सर्व कर्मचाऱ्यांना आवश्‍यक असतात, ते देण्यात येणार आहेत आणि गणेश जयंतीच्या मुख्य सोहळ्यादिवशी सर्व शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, उत्तरेश्‍वर पेठ, बुधवार पेठ, भरपेट आस्वाद घेईल, असे २१ हजार लोकांना स्नेहभोजन दिले जाणार आहे. जातपात धर्म पंथ सगळे विसरून लोकांनी मांडीला मांडी घालून एकत्र जेवणाला बसावे, ही या मागील भावना आहे. 

‘धार्मिक सोहळा केवळ आपल्या समाधानासाठी करण्यात काही अर्थ नाही. या सोहळ्याचे समाजाशी काही देणे-घेणे आहे, हे विचारात घेऊन आम्ही गणेश जयंतीला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड दिली आहे. आम्ही जो सामाजिक खर्च करतो, तो केला नसता तर आमचा सोहळा खूप झगमगाटात झाला असता, पण आम्हाला तसे नको आहे. समाजासाठी जे काही करता येईल, तेच सोहळ्यातून केले जाणार आहे.’
- मोहन सरवळकर,
संस्थापक अध्यक्ष

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Shivneri Ganesh Tarun Mandal Social work special