करवंदे विकणाऱ्या महिलांना मिळवून दिली हक्काची बाजारपेठ

सुधाकर काशीद
शनिवार, 5 जानेवारी 2019

कोल्हापूर - काट्याकुट्यात जाऊन करवंदे तोडायची. त्याला गिऱ्हाईकासाठी वाट पाहायची. घासाघीस करून करवंदे विकायची आणि दिवसभरात जे काही मिळेल त्यावर मीठ मिरची घेऊन दिवस मावळताना घरची वाट धरायची.... करवंदे विकणाऱ्या महिलांच्या आयुष्याचे हे पिढ्यान्‌ पिढ्याचे चक्र. परंतु, हे चक्र थोपवण्याचा एक छोटासा प्रयत्न इथल्या काही तरुणांनी यशस्वी केला आहे. 

कोल्हापूर - काट्याकुट्यात जाऊन करवंदे तोडायची. त्याला गिऱ्हाईकासाठी वाट पाहायची. घासाघीस करून करवंदे विकायची आणि दिवसभरात जे काही मिळेल त्यावर मीठ मिरची घेऊन दिवस मावळताना घरची वाट धरायची.... करवंदे विकणाऱ्या महिलांच्या आयुष्याचे हे पिढ्यान्‌ पिढ्याचे चक्र. परंतु, हे चक्र थोपवण्याचा एक छोटासा प्रयत्न इथल्या काही तरुणांनी यशस्वी केला आहे. 

करवंदे विकणाऱ्या महिलांकडून त्यांची सर्व करवंदे विकत घ्यायची. त्याचा ज्यूस करून त्याची पुढे वर्षभर विक्री करायची, असा हा प्रयत्न आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत अशा पद्धतीने त्यांनी सात हजार लिटर करवंदाचा ज्यूस विकला आहे. करवंदा सारख्या अतिशय पौष्टिक रानमेव्याला त्यांनी किमंत आणि मान मिळवून दिला आहे.

करवंदे विकऱ्या माता भगिनींना बळ देणे, करवंदासाठी दिवस दिवसभर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्यांना हक्काची विक्री मिळवून देणे, केवळ मे महिन्यात मिळणाऱ्या या करवंदाचा बारा महिने वापर करता यावा म्हणून त्याचा नैसर्गिक प्रक्रियेत ज्यूस करून तो केवळ घराघरात नव्हे तर पंचतारांकित हॉटेलात पोहचवणे हा या तरुणांचा हेतू आहे. 

या पूर्वी गगनबावडा तालुक्‍यात शेखर धर्माधिकारी यांनी जलभारती न्यासाच्या वतीने खूप चिकाटीने हा प्रयोग चालवला आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन या तरुणांनी ‘सात्विक’ या नावाने हा प्रयोग अधिक ताकदीने राबवला आहे. 

सत्विकच्या वतीने सुरु असलेल्या या प्रयोगात गगनबावडा परिसरातील महिला-मुली करवंदे तोडून ते एका ठिकाणी गगनबावद्यातील बापू जाधव यांच्याकडे घालतात. ते या करवंदाचे वर्गीकरण करतात. स्वछ करतात व त्याच्या कच्चा ज्यूस काढतात. त्यानंतर त्यात कोणताही रासायनिक घटक न घालता पक्का ज्यूस तयार करतात. त्यामुळे करवंदाचा ज्यूस सात्विकच्या वतीने जेथे तेथे अवघ्य ५ रुपयात ग्लास या प्रमाणात विक्रीसाठी ठेवला जातो. त्याला खूप प्रतिसाद मिळतो. आता हा प्रयोग पहिल्या टप्यात आहे. भविष्यात त्याची क्षमता वाढवली जाणार आहे. अर्थातच त्यामुळे करवंदाचा मान आणि शान अधिकच वाढणार आहे. 

आम्ही करवंदाला बाजारपेठ मिळावी, करवंदे गोळा करणाऱ्या महिलांना करवंदे विकण्यासाठी दिवसदिवसभर रस्त्यावर तिष्टत थांबावे लागू नये, यासाठी या प्रयोगाची सुरुवात केली. अर्थात यातून जे मिळेल, त्याचा वाटा महिलांना मिळणार आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहे. या उपक्रमात सागर बकरे, सारिका बकरे, मनीषा मिश्रा, ब्रिजेश आध्याय, वैभव तपकिरे, मनीषा पाटील यांचा सहभाग आहे.
- सागर बकरे,
सात्विक फूडस्‌.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New venture to give market to Carissa spinarum selling women