परमुलखात मायलेकींना माणुसकीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

गुनाट - ना मराठी भाषेची जाण... ना ओळखीचा एकही माणूस... त्यामुळे त्या दोघींची परमुलुखात सुरू असलेली घालमेल निमोणे (ता. शिरूर) येथील तरुणांनी हेरली आणि संकटात सापडलेल्या त्या मायलेकींना मानसिक व आर्थिक आधार देत सुखरूपपणे आपल्या मूळ गावी रवाना करत माणुसकीचे दर्शन घडविले.   

गुनाट - ना मराठी भाषेची जाण... ना ओळखीचा एकही माणूस... त्यामुळे त्या दोघींची परमुलुखात सुरू असलेली घालमेल निमोणे (ता. शिरूर) येथील तरुणांनी हेरली आणि संकटात सापडलेल्या त्या मायलेकींना मानसिक व आर्थिक आधार देत सुखरूपपणे आपल्या मूळ गावी रवाना करत माणुसकीचे दर्शन घडविले.   

शिरूर येथे केबल वाहिनी गाडण्याच्या कामासाठी आंध्र प्रदेश राज्यातून कामगार आले होते. येथील कामाची मुदत संपल्यानंतर गावी जाताना मायलेकींची त्यांच्या कुटुंबाशी अनाहूतपणे ताटातूट झाली. आपल्या कुटुंबाला शोधत त्या निमोणे या ठिकाणी आल्या. मात्र, येथेही कुटुंबातील कोणीच भेटले नाही. त्यातच या दोघींना तेलुगू भाषेव्यतिरिक्त अन्य दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांशी संवाद कसा साधावा, आपली अडचण कशी सांगावी, हा प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला.

सुमारे दोन तास त्या बावरलेल्या आणि घाबरलेल्या नजरेने गावात फिरत होत्या. मात्र पोटे महाराज, डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, मयूर ओस्तवाल, बिभीषण गायकवाड, भरत हिंगे, पप्पू पाटील, अभय काळे, सागर साकोरे या युवकांनी त्यांना धीर दिला. त्यातही भाषेची अडचण आल्याने मयूर ओस्तवाल यांनी आपल्या चेन्नई येथील मित्राला फोन लावत तेलुगू भाषेतून त्या कुटुंबाशी संवाद साधण्यास सांगितले. त्या संवादातून त्यांची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. लागलीच या तरुणांनी दीड हजार रुपये जमा केले आणि त्यांना जेवणही दिले. तसेच, त्या आपल्या मूळ गावी सुखरूप पोचतील, याचीही व्यवस्था केली. 

माणुसकी अजूनही जिवंत आहे
अनोळखी मुलखात तरुणांच्या या माणुसकीच्या भावनेने त्या दोघी मायलेकींचा ऊरही कृतज्ञतेने भरून आला. सध्या महिलांच्या बाबतीत पुरुषांच्या बोथटलेल्या भावना अलीकडच्या काही घटनांवरून प्रकर्षाने दिसून येतात. मात्र, अनोळखी परमुलखात अडचणीत सापडलेल्या मायलेकींना स्थानिक तरुणांचे भावासारखे मिळालेले पाठबळ ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ हेच दाखवून देते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nimone youth help to women humanity