#SundayMotivation : दुष्काळातही पिकतोय दररोज दहा लाखांचा भाजीपाला 

दत्ता देशमुख
रविवार, 18 ऑगस्ट 2019

दुष्काळ, नापिकी आणि आत्महत्या असे शेतीबाबत नकारात्मकता चित्र असताना पिंपळगावकरांनी तीन-चार पिढ्यांपासून भाजीपाला उत्पन्नाची कास सोडली नाही. नव्या पिढीनेही यात उतरत पारंपरिक भाजीपाला शेतीला आता नवीन प्रयोग आणि नवतंत्रज्ञानाची जोड दिली आहे.

बीड - दुष्काळ, नापिकी आणि आत्महत्या असे शेतीबाबत नकारात्मकता चित्र असताना पिंपळगावकरांनी तीन-चार पिढ्यांपासून भाजीपाला उत्पन्नाची कास सोडली नाही. नव्या पिढीनेही यात उतरत पारंपरिक भाजीपाला शेतीला आता नवीन प्रयोग आणि नवतंत्रज्ञानाची जोड दिली आहे. गावातून दररोज दहा टन भाजीपाला उत्पादन होऊन यातून साधारण दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न गावाच्या वेशीत येत आहे. विशेष म्हणजे खुल्या पद्धतीने सिमला मिरची उत्पादनाचा प्रयोगही पिंपळगाव (ता. केज) येथील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. 

उच्चप्रतीच्या उत्पादनामुळे लातूर, बीड, परभणी, अंबाजोगाई या बाजारपेठांसह नवी दिल्ली, नवी मुंबई, राजस्थानच्या श्रीहरी कोटा, पश्‍चिम बंगाल आदी ठिकाणच्या बाजारपेठांतही शेतकऱ्यांनी आपल्या मालाचा डंका वाजविला आहे. चांगल्या प्रतिचा भाजीपाला उत्पादन होत असल्याने आता शेतकऱ्यांनी बाजारात जाऊन विकण्याऐवजी व्यापारीच बांधावर येऊन माल घेऊन जातात. गावातील प्रा. उद्धव घोळवे, सुभाष गायकवाड, सहदवे घोळवे, अंकुश गायकवाड, ज्ञानोबा गायकवाड, केशव घोळवे आदी साधारण लहान-मोठ्या 80 शेतकऱ्यांच्या मळ्यांत पत्ता कोबी, फूलकोबी, वांगे, टोमॅटो, ढोबळी मिरची, लांब मिरची, पालक अशी पिके बहरात असून अनेक पिकांचे उत्पादनही निघत आहे. गावातून आजघडीला रोज किमान दहा टन भाजीपाला निर्यात होतो. यातून गावाला मोठी आर्थिक भरभराट मिळाली. भाजीपाला शेतीला अलीकडे फुलशेतीची जोड मिळाली आहे. यातून गावाच्या तिजोरीत रोज पाच लाखांची रक्कम येते. खर्च जाता यातून मोठी कमाई गावाला होते. 

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड 
पूर्वी विहिरींच्या पाण्यावर शेती केली जाई. अलीकडे नवी पिढीही या शेतीत उतरली आणि काही शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे अवलंब केले गेले. यात ठिबक, तुषार, शेततळे, सोलार पॅनेल, मल्चिंग अशा पद्धतींचा अवलंब होत आहे. आजघडीला दररोज किमान दहा टन भाजीपाला निर्यात होतो. यातून गावाला मोठी आर्थिक भरभराट मिळाली. भाजीपाला शेतीला अलीकडे फुलशेतीची जोड मिळाली आहे. विशेष म्हणजे दुष्काळात काही शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारेही पाणी विकत घेत शेती फुलविली आहे. 

सिमला मिरचीचे खुले उत्पादन 
पूर्वी सिमला मिरचीचे उत्पादन केवळ पश्‍चिम महाराष्ट्रात होई. सिमला मिरची फक्त पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस किंवा सेडनेटमध्येच होई; परंतु, खुल्या पद्धतीने सिमला मिरचीचे उत्पादन घेण्याचा धाडसी प्रयोग चार वर्षांपूर्वी उद्धव घोळवे यांनी केला. त्याला यश आले आणि गावात हे उत्पादन सर्रास सुरू झाले. सध्या साधारण 12 ते 15 एकरांवर सिमला मिरची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one million lakh of vegetables are growing every day