गुरुजीच्या पुढाकारातून ‘एक गाव गणिताचा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

भूम - विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या मनातील गणित विषयाची भीती दूर व्हावी, या हेतूने तालुक्‍यातील सुकटा येथील शंभराहून अधिक ठिकाणी गणिताची सूत्रे लिहिण्याचा उपक्रम एका शिक्षकाने क्रीडा मंडळाच्या सहकार्याने राबविला आहे. त्यामुळे गावात प्रवेश केल्यानंतर कोणत्याही रस्त्याने जाताना विविध कार्यालये, पाण्याच्या टाकीसह संरक्षण भिंतीवर गणिताची सूत्रे नजरेस पडतात. हा उपक्रम विद्यार्थ्यांची गणित विषयाची भीती दूर होण्यास नक्कीच फायदेशीर आहे.

‘एक गाव गणिताचा’ हा उपक्रम सुकटा गावातील सहशिक्षक प्रकाश यादगिरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला आहे. यासाठी शिवशाही क्रीडा मंडळाने सहकार्य केले आहे. गावातील जवळपास शंभराहून अधिक भिंतीवर गणिताची सूत्रे लिहून विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांना वाटणारी गणित विषयाची भीती दूर करण्याचा प्रयत्न आहे. ‘एक गाव गणिताचा’ या मथळ्याखाली जनजागृती करण्यात येत आहे. सुकटा या गावाची लोकसंख्या जवळपास सात हजार आहे. पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद प्रशाला आहे. याशिवाय माध्यमिक शिक्षणासाठी छत्रपती शिवाजी हायस्कूल आहे. 

याच शाळेतील सहशिक्षक श्री. यादगिरे यांच्या संकल्पनेतून व शिवशाही क्रीडा मंडळाच्या सहकार्यातून पाण्याच्या टाकीवर, ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर, गावातील सर्व विविध ठिकाणच्या भिंतीसह संरक्षण भिंतीवर वर्तुळे, अवयवे, नफा तोटा, आकृती, परिमिती, क्षेत्रफळ सूत्रे व गणितातील चिन्हे, वर्गमूळ, थिटा, समांतर, पाया, समरूप, छेद असे विविध गणितातील सोपे व अवघड सूत्रे गावातील भिंतीवर रेखाटली आहेत.

गणित विषयाबाबत अनेकांच्या मनात अनामिक भीती असते; मात्र ज्या विषयामध्ये बोर्ड परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण पडतात, तो विषय अवघड कसा असू शकतो, हा विचार करून गणित विषयाची भीती घालविण्यासाठी हा विषय सोपा व मनोरंजक करायचे ठरविले. सूत्र हा गणिताचा कणा आहे. या संकल्पनेने एक गाव गणिताचा हा शैक्षणिक उपक्रम राबवायचे ठरविले.
- प्रकाश यादगिरे, सहशिक्षक, सुकटा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one village mathematics education formula