अवघ्या दहा रुपयांत रुग्णसेवा!

समाधान काटे  
बुधवार, 9 जानेवारी 2019

गोखलेनगर - रुग्ण डॉक्‍टरांकडे देव म्हणून पाहतात, हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय. पण खरंच एक डॉक्‍टर रुग्णांची सेवा असे करतात, की परिसरातील नागरिक त्यांना ‘देवा’ या नावानेच हाक मारतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हे देव आहेत डॉ. शशिकांत चव्हाण. जनवाडी-गोखलेनगरमधील हा देव रुग्णांना केवळ दहा रुपयांत सेवा देत आहेत.  

गोखलेनगर - रुग्ण डॉक्‍टरांकडे देव म्हणून पाहतात, हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय. पण खरंच एक डॉक्‍टर रुग्णांची सेवा असे करतात, की परिसरातील नागरिक त्यांना ‘देवा’ या नावानेच हाक मारतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हे देव आहेत डॉ. शशिकांत चव्हाण. जनवाडी-गोखलेनगरमधील हा देव रुग्णांना केवळ दहा रुपयांत सेवा देत आहेत.  

डॉ. चव्हाण हे बी.एच.एम.एस. होमिओपॅथिक आहेत. त्यांनी १९८२ मध्ये रुग्णसेवेस सुरवात केली आणि तेही केवळ एक रुपयात. आज एवढी महागाई वाढली आहे. जागोजागी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभी राहिली आहेत. उपचारासाठी रुग्णांकडून लाखो रुपये उकळले जाताहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे डॉ. चव्हाण फक्त दहा रुपयांच्या नाममात्र फीमध्ये रुग्णांना तपासून गोळ्या देतात. इतर दवाखान्यात हीच फी कमीत कमी १५० ते ५०० रुपये घेतली जाते. 

गोखलेनगर हा भाग कष्टकरी लोकांचा. विविध जाती-धर्मातील लोक या भागात राहतात. लोकांना कमी पैशांत उपचार मिळावेत, या उद्देशानेच डॉ. चव्हाण यांनी येथे दवाखाना सुरू केला. त्यांचा स्वभाव आणि सेवा यामुळे या भागातील प्रत्येकाला डॉक्‍टरांबद्दल आपुलकी आहे. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र, हे दु:ख चेहऱ्यावर न दाखवता त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाशी हसत संवाद साधत ते सेवा बजावतात.

डॉक्‍टर आमचे देवच आहेत. खूप वर्षांपासून आम्ही त्याच्याकडे उपचार घेतो. मुलाला ताप होता म्हणून त्यांच्याकडे सोमवारी गेलो होतो. पूर्वी उपचारासाठी पाच रुपये घेत होते. सध्या दहा रुपये घेतात.
-गोपाळ कर्मकार, पिंपरी-चिंचवड

मी पूर्वी डॉ. चव्हाण यांच्याकडेच काम करत होतो. सध्याच्या महागाईच्या काळात १० रुपयांमध्ये कुठेच सुविधा मिळत नाही. वेळेचे काही बंधन नाही. रुग्ण कधीही येतात. लोक खूप दूरवरून उपचारासाठी त्यांच्याकडे येतात.
-उमेश सूर्यवंशी, नागरिक, जनवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 10 rupees patient services