‘ओझोन’च्या वापराने स्वस्त-मस्त पाणी

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 6 March 2019

पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते. या यंत्रणेचा प्रायोगिक वापर सुरू झाला असून, शहराबरोबरच ग्रामीण भागातील रहिवाशांना हे वरदानच ठरणार आहे. शास्त्रज्ञ आनंद भावे यांनी हे संशोधन केले आहे. 

पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते. या यंत्रणेचा प्रायोगिक वापर सुरू झाला असून, शहराबरोबरच ग्रामीण भागातील रहिवाशांना हे वरदानच ठरणार आहे. शास्त्रज्ञ आनंद भावे यांनी हे संशोधन केले आहे. 

कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कार्यरत असताना सहा वर्षांपूर्वी भावे यांच्या विद्यार्थिनींनी ‘सुती कपड्यातून गाळून घेतलेले पाणी ओझोनने शुद्ध करणे,’ असा प्रकल्प केला होता. भावे यांनी केलेल्या संशोधनावर आधारित ‘ओतीन’ यंत्रणा फोर आय रिसर्च प्रा. लि. कंपनीने तयार केली आहे. कंपनीचे संशोधक संचालक असलेले भावे यांनी याबाबतची माहिती ‘सकाळ’ला दिली. पुण्यातील ३०० घरांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आल्याचे कंपनीचे संचालक टी. पी. वर्तक यांनी सांगितले.

जलशुद्धीकरणासाठी सर्रास क्‍लोरिनचा वापर केला जात असला, तरी त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्‍यता असते. यामुळे अनेक विकसित देशांनी क्‍लोरिनचा वापर बंद केला आहे. क्‍लोरिनच्या तुलनेत ओझोन हा ५० टक्के जास्त सक्षम असून, तीन हजार पट जास्त वेगाने काम करतो, शिवाय पाणी शुद्ध झाल्यानंतर त्यात जंतू शिल्लक राहात नाहीत. अनेक प्युरिफायरमध्ये यू. व्ही. बल्बचा वापर केला जातो, मात्र कालांतराने प्युरिफायरच्या काचेवर जैविक थर जमा झाल्याने यू. व्ही. किरणे पाण्यात पोहोचत नाहीत. ओझोन मात्र थेट पाण्यात मिसळला जात असल्याने संपूर्ण पाणी अवघ्या काही मिनिटांत निर्जंतूक होते. त्यासाठी सौरऊर्जेचाही वापर करता येतो, असे भावे यांनी सांगितले. 

हवा आणि वीज हाच कच्चा माल 
हवा आणि विजेच्या मदतीने ओझोनची निर्मिती होते. एका भांड्यात सुती कपड्यातून गाळून घेतलेले पाणी घेतले जाते. ‘ओतीन’ यंत्र सुरू करताच, यंत्राला असलेली नळी या भांड्यात सोडल्यानंतर नळीमधून येणाऱ्या ओझोनच्या बुडबुड्यांमुळे पाण्याच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू होते. यामध्ये एक लिटर पाण्यासाठी केवळ दोन ते तीन पैसे इतका खर्च येतो. या यंत्रणेने भाज्या-फळेही निर्जंतुक होतात, असे भावे यांनी सांगितले. 

‘ओतीन’वर ॲपद्वारे नियंत्रण 
कार्यालये, हॉटेल, शाळा, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये २००, ५०० आणि दोन व पाच हजार लिटर क्षमतेचे ‘ओतीन’ यंत्र वापरता येते. यंत्रावर नियंत्रणासाठी ॲप तयार केले आहे. दर तीन मिनिटांनी हे ॲप यंत्राच्या कार्यक्षमतेबाबत माहिती देते. घरगुती वापरासाठी २० लिटर क्षमतेचे यंत्र तयार करण्यात आले आहे.

बांधकाम प्रकल्पांवरील टॅंकरचे पाणी पिणारे मजूर आजारी पडतात. मात्र, या यंत्रणेच्या वापराने त्यांच्या आजाराचे प्रमाण खूप कमी झाले आहे. प्रकल्पावर रोज दहा हजार लिटर पाणी निर्जंतूक केले जाते. यासाठीचा खर्चही कमी आहे. 
- विलास जावडेकर, बांधकाम व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ozon Use Water