कागदाचे तुकडे - जगण्याचा आधार

लुमाकांत नलवडे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

अहवाल, पुस्तके, वह्यांचे बायंडिंग करून पडलेले कागदाचे तुकडे अनेकांच्या संसाराचा आधार बनले आहेत. साळोखे पार्क परिसरातील तब्बल दीड-दोनशे संसारांना आर्थिक हातभार लागला आहे. या परिसरातील महिला हे तुकडे निवडून देण्याचे काम करतात.

अहवाल, पुस्तके, वह्यांचे बायंडिंग करून पडलेले कागदाचे तुकडे अनेकांच्या संसाराचा आधार बनले आहेत. साळोखे पार्क परिसरातील तब्बल दीड-दोनशे संसारांना आर्थिक हातभार लागला आहे. या परिसरातील महिला हे तुकडे निवडून देण्याचे काम करतात. त्यातून त्यांना रोज दीड-दोनशे रुपये पदरी पडतात. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरातून हे तुकडे व्यापारी थेट साळोखे पार्कमध्ये आणतात. तेथे त्यांचे वर्गीकरण होते आणि तेथून ते गठ्ठे मार्केट यार्डमध्ये जातात. तेथील एजंट हे गठ्ठे थेट फॅक्‍टरीत कागदाचा लगदा बनविण्यासाठी पाठवितात. 

साळोखे पार्क म्हणजे कष्टकऱ्यांची वसाहत. साधारण दोन-अडीच हजार लोकसंख्येची वस्ती. आयुष्यात जगणं अवघड  झालंय. महागाई वाढली. हाताला काम नाही. असे म्हणून रडत बसायचे नाही. मिळेल त्या कामातून कष्टाने पैसे मिळवायचे अशीच या सर्वसामान्यांची जिद्द आहे. याच जिद्दीतून परिसरात कागदाचे तुकडे मिळवून ते स्वतंत्र करून देण्याचा उद्योग सुरू झाला. साळोखे पार्क परिसरात पाच सहा व्यक्ती हा मुख्य व्यवसाय करतात. यांतील दोघे जण पंधरा वर्षे हा व्यवसाय करतात.

येथील व्यापारी कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरात फिरतात. तेथील प्रत्येक प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन ते बायंडिंग झालेल्या पुस्तकांचे, अहवालाचे पडलेले तुकडे गोळा केले जातात. तेथून ते साळोखे पार्कात आणले जातात. तेथे रंगीत कागदांचे तुकडे, पुठ्यांचे तुकडे, लॅमिनेटेड कागदांचे तुकटे स्वंतत्र केले जातात. यासाठी येथील महिलांना काम दिले जाते. महिला घरगुती काम पाहून कागदांच्या तुकड्यांचे विभाजन करतात. प्रत्येक महिलेला साधारण दिवसाला दीड-दोनशे, कधी कधी तीनशे रुपयेही मिळतात. साळोखे पार्कमध्ये प्रवेश केल्यानंतर छोट्या-छोट्या गल्ल्यांत कागदांच्या तुकड्यांची पोती पहावयास मिळतात. या पोत्यांतील कागदांचे गठ्ठे महिलांना वाटले जातात. त्या महिला गठ्ठ्यांतील कागदांचे विभाजन करून देतात. 

किलोवर ठरतो मोबदला
प्रत्येक महिलेला पाच-दहा, वीस किलोपर्यंत कागदाचे गठ्ठे दिले जातात. त्यांचे वर्गीकरण करून त्या पुन्हा व्यापाऱ्याकडे देतात. त्याचे वजन करून किलोप्रमाणे महिलांना मोबदला दिला जातो. संपूर्ण साळोखे पार्कमधील आढावा घेतला तर रोज किमान एक टन कागदांच्या तुकड्यांचे विभाजन येथे होत असल्याचे व्यापारी सांगतात.

आठ महिलांना रोजगार
शहरातून कागदांचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरू केले. आता कोल्हापूरसह सांगली, कराड येथून कागदाचे तुकडे गोळा करून आणले जातात. यावर रोज किमान सात-आठ महिलांना रोजगार देत असल्याचे व्यापारी दत्तात्रय केरबा मस्तुद यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यांचा मुलगाही आता याच व्यवसायात पुढे येत आहे.

घरखर्चाला उपयोगी..
रोज दोन-तीनशे रुपये घरकाम पाहून मिळवता येतात. सोपं काम आहे. त्याला शिकायला लागत नाही. मुलांसाठीचे दूध, शिक्षणासाठी पाटी-पेन्सिलसाठी हे पैसे उपयोगी पडतात. कागदाचे तुकडे गोळा करायला गावभर फिरण्यापेक्षा घरबसल्या काम करणे सोपे झाल्याचे काही महिलांनी सांगितले.

जागेसाठी हातभार हवा
व्हाईट रेकॉर्ड, कलर रेकॉर्ड, स्क्रॅप अशा शब्दांत कागदांचे वर्गीकरण करीत असल्याचे व्यावसायिक सांगतात. काही व्यापारी टेम्पोने तर काही व्यापारी ट्रकने येथे कागदांचे तुकडे आणतात आणि पुन्हा वर्गीकरण करून पाठवून देतात. या महिलांना आणि व्यापाऱ्यांना बॅंकांकडून, सरकारकडून आर्थिक आणि जागेसाठी हातभार मिळाला तर नक्कीच महिलांच्या उन्नतीसाठी एक वेगळी बाजारपेठ येथे तयार होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paper pieces - The basis for living