एकत्रित प्रयत्नांतून सुरू झाले 'चारचौघी' दालन

एकत्रित प्रयत्नांतून सुरू झाले 'चारचौघी' दालन

परभणी शहरातील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सुरेखा नरेंद्र कुलकर्णी या विविध प्रकारचे मसाले, चटण्या, विविध प्रकारची पिठे तयार करतात. वर्षा हेमंत कौसडीकर या फराळाचे पदार्थ तयार करतात. संगीता विष्णू पोहनेरकर गृहोपयोगी वस्तू, गिफ्ट आर्टिकल विक्री करतात. बाजारपेठेची गरज ओळखून या तिघींनी विविध प्रक्रिया उत्पादने, पदार्थ आणि गृहोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये विविधता ठेवली आहे.

मागणीनुसार गिफ्ट आर्टिकल
संगीता विष्णू पोहनेरकर या गेल्या बारा वर्षांपासून व्हाईट मेटल, ब्रास, पितळापासून शोभेच्या व गृहोपयोगी वस्तू, खेळणी, समई, फुलवाती, पर्स, बॅग, ज्वेलरी आदी वस्तूंच्या घाऊक तसेच किरकोळ विक्रीचा गृहोद्योग करतात. या व्यवसायामुळे महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.
 : संगीता पोहनेरकर, ९४२१७८८३००

‘ब्रॅंन्ड नेम` ने उत्पादनांची विक्री
परभणी येथील सुरेखा नरेंद्र कुलकर्णी यांचे शिक्षण बी. काॅम पदवीपर्यंत झालेले आहे. त्यांचे पती नरेंद्र हे बॅंकेत नोकरीस होते. शेळगाव (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथे कुलकर्णी यांची साडेसात एकर शेती आहे. स्वेच्छा सेवनिवृत्तीनंतर नरेंद्र कुलकर्णी हे शेती करतात. शेतीमध्ये भाजीपाला, मूग, सोयाबीन, कापूस, हरभरा, ज्वारी या पिकांची ते प्रामुख्याने लागवड करतात. केवळ पीक उत्पादनावर न थांबता सुरेखा कुलकर्णी यांनी शेतीमाल मूल्यवर्धन करण्यासाठी मंगल सुधा अॅग्रो इंडस्ट्रीजची नोंदणी करत २०१५ पासून विविध प्रक्रिया पदार्थाच्या निर्मितीस सुरवात केली. सुरेखाताईंनी सुरवातीला येसर मसाला तयार करून परभणी शहरातील किराणा दुकानांमध्ये विक्रीस ठेवला. ग्राहकांना येसर मसाल्याची चव पसंद पडल्यामुळे मागणी वाढू लागली. त्यामुळे सुरेखाताईंनी उत्पादन वाढविले. तसेच मसाला निर्मितीस सुरवात केली. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सुरेखाताईंनी येसर मसाला, मेतकुट, नाचणी पीठ, भरडा, ज्वारी पीठ, गहू पीठ, सातू पीठ, बेसन पीठ, जवस चटणी, कारळा चटणी, शेंगदाणा चटणी, पूड चटणी निर्मितीस सुरवात केली. यासोबत राजगिरा, भगर, साबुदाणा पीठ, मिक्स उपवास भाजणी या उपवासाच्या पदार्थांची त्या निर्मिती करतात. त्यांच्याकडे उपवासाचे पदार्थ आणि इतर पिठे तयार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या पीठ गिरण्या आहेत. विविध पिठांचे पॅकिंग करण्यासाठी त्यांनी पॅकिंग यंत्र घेतले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सुरेखाताई येसर मसाला १०० ग्रॅम तर विविध प्रकारच्या पिठांचे २५० ग्रॅम ते एक किलोमध्ये पॅकिंग करतात. मंगल-सुधा या ‘ब्रॅंन्ड नेम` ने उत्पादनांची विक्री करतात. 
 : सुरेखा कुलकर्णी, ९९७५११७३८५

पदार्थांच्या चवीमध्ये ठेवले वेगळेपण
परभणी शहरातील वर्षा हेमंत कौसडीकर यांचे मूळ गाव कौसडी (ता. जिंतूर) हे आहे. या गावामध्ये त्यांच्या कुटुंबाची शेती आहे. गृहउद्योगास सुरवात करण्यापूर्वी वर्षाताईंनी घरी चकली तयार करून विक्रीस सुरवात केली. पहिल्यांदा परिसरातील ओळखीच्या लोकांना चकली विकण्यास सुरवात केली. लोकांना चकलीची चव आवडल्याने मागणी वाढू लागली. अल्पावधीमध्येच कौसडीकरांची चकली म्हणून त्यांच्या उत्पादनास प्रसिद्धी मिळाली. ग्राहकांच्याकडून मागणी वाढल्यामुळे वर्षाताईंनी चकली सोबत फराळाच्या विविध पदार्थांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यामध्ये तयार केले जाणारे पारंपरिक पदार्थ तसेच आधुनिक पध्दतीने तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला. यामध्ये प्रामुख्याने बाजरीच्या खारोड्या, कुरडया, पापड्या तसेच हिरवी मिरची, बाजरी, लसूण, मूग, उडीद, तांदूळ, पोहे, नाचणीचे पापड त्या बनवितात. हात शेवया आणि मशिन शेवया अशा विविध पाच प्रकारच्या शेवयांच्या निर्मितीस त्यांनी सुरवात केली. 

दिवाळीच्या फराळामध्ये बुंदी लाडू, शेव, फरसाण, बालूशाही, शंकरपाळे, करंजी निर्मिती त्या करतात. दिवाळी फराळ पदार्थांनादेखील अल्पावधीत मागणी वाढली. याचबरोबरीने ग्राहकांच्या मागणीनुसार उकडीचे मोदक तसेच सणावारीसाठी लागणारे पदार्थ तयार करून देतात. खाद्यपदार्थ तयार करताना प्रामुख्याने तेलाचा पुनर्वापर टाळला जातो. विविध पदार्थांच्या निर्मितीमुळे वर्षाताईंच्या गृहउद्योगाचा विस्तार झाला. या उद्योगामध्ये सहा महिलांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे या महिला ग्रामीण भागातील असून कोणत्या न कोणत्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या आहेत. वर्षाताईंच्या खाद्य पदार्थांची परभणी शहरात विक्री होते. त्याचबरोबरीने लातूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरे तसेच अमेरिका, इंग्लड, आॅस्ट्रेलिया आदी देशातील मराठी भाषिक कुटुंबामध्ये विविध खाद्य पदार्थ पोचले आहेत. वर्षभरातील खाद्य पदार्थांची उलाढाल पाच लाखांपर्यंत गेली आहे.
 : वर्षा कौसडीकर, ९४२३४४४८६६

चारचौघी दालनाची सुरवात
आत्तापर्यंत सुरेखाताई, वर्षाताई, संगीताताई यांच्या उत्पादनांची घरातून विक्री होत होती. विविध प्रदर्शनातून देखील त्या उत्पादनांची विक्री करतात. तिघींची उत्पादने परभणी शहरातील ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली तर फायदा होऊ शकतो अशी संकल्पना संगीताताईंनी मांडली. यास अन्य दोघींनी सहमती दिली. शहरातील  एका व्यापारी संकुलात तिघींनी एक गाळा भाडेतत्त्वावर घेतला. येथे तिघींची उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. याठिकाणी ग्राहकांना एकाच वेळी पसंतीनुसार विविध खाद्य पदार्थ तसेच गीफ्ट आर्टिकलची खरेदी करता येते. सकाळी ११ ते २ आणि संध्याकाळी ४ ते ९ या वेळत हे दालन उघडे असते. यामुळे प्रत्येकीच्या वेळेची बचत झाली. प्रत्येक जण ठरलेल्या वेळेनुसार दुकानाचे व्यवस्थापन सांभाळतात. त्यामुळे इतर दोघींना उत्पादन निर्मितीची कामे करता येतात. विक्री झालेल्या उत्पादनांचा प्रत्येकीचा स्वतंत्र हिशेब असतो. दररोज संध्याकाळी हिशेब करून हिश्‍श्याची रक्कम वाटून घेतली जाते. व्हॉट्‌सॲप ग्रुप, माहिती पत्रकाव्दारे उत्पादनांचा प्रचार केला जातो. दर्जेदार उत्पादनामुळे ग्राहकांची मागणी वाढत आहे. लवकरच लोकांची मागणी लक्षात घेऊन या तिघीजणी पोळी भाजी दालन सुरू करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com