दुरावलेल्या भावंडांच्‍या चेहऱ्यावर खुलले ‘स्माइल’

संदीप घिसे
मंगळवार, 27 जून 2017

पिंपरी -  दोन वर्षांपूर्वी हरविलेल्या भावाचा शोध त्यांची बहीण दिवसरात्र घेत होती. मात्र, फेसबुकवरील एका पोस्टमुळे त्या बहीण भावाची भेट झाल्यावर दोघांनाही अश्रू अनावर झाले. ही भेट घडवून आणण्यात ‘स्माइल प्लस’ या संस्थेचे योगेश मालखरे यांची मोलाची मदत झाली.

पिंपरी -  दोन वर्षांपूर्वी हरविलेल्या भावाचा शोध त्यांची बहीण दिवसरात्र घेत होती. मात्र, फेसबुकवरील एका पोस्टमुळे त्या बहीण भावाची भेट झाल्यावर दोघांनाही अश्रू अनावर झाले. ही भेट घडवून आणण्यात ‘स्माइल प्लस’ या संस्थेचे योगेश मालखरे यांची मोलाची मदत झाली.

बिजलीनगरच्या पुलाखाली अनेक दिवसांपासून एक व्यक्‍ती बसली असल्याची माहिती मिळताच मालखरे हे आपल्या सहकारी स्वाती डिंबळे व वाल्मीकी कुटे यांच्यासह घटनास्थळी पोचले. ओंगळवाण्या अवस्थेत असलेल्या व्यक्‍तीची आस्थेने चौकशी केली. त्यानंतर मालखरे यांनी या व्यक्‍तीची माहिती फेसबुकवर टाकली. ही माहिती वाचून एका चप्पलच्या दुकानदाराने मालखरे यांना फोन करून या व्यक्‍तीबाबत विचारपूस केली. त्याचे नाव चेतन नाथानी असून तो आपल्या दुकानात कामाला होता. तसेच त्याची बहीण निशा कदम त्याला शोधत असल्याचेही सांगितले. दुकानदाराने निशा यांना माहिती सांगितल्यावर त्यांनी मालखरे यांच्याशी संपर्क साधून भावाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन वर्षांपासून ४०० रुपये रुमालात बांधून ठेवल्याची आठवणही निशा यांनी सांगितली. चेतनबाबत माहिती द्या, मगच भेट घडवून आणतो, असे सांगत निशाला भाजपचे नेते आझम पानसरे यांच्या घरी बोलावले. निशा तेथे पोचल्यावर मालखरे यांच्या कार्यकर्त्यांनी चेतनला तिथे आणले. अचानक आलेल्या भावाला पाहून त्याच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. तिने भावाला मिठी मारली. दोघे बराचवेळ न बोलता केवळ एकमेकांना पाहून रडत होते. त्यानंतर सर्वांनी चेतनच्या नवजीवनाचा वाढदिवस केक कापून साजरा केला.

मनोरुग्णांचा आधार
रस्त्यावर कोणताही मनोरुग्ण अथवा भिकारी व्यक्‍ती दिसल्यास त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधायचा. त्यांचा विश्‍वास संपादन झाला की ओंगळवाण्या रूपाचा कायापालट करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे तयार करायचे. आवश्‍यकतेनुसार त्याच्यावर मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करायचे, असे काम गेल्या अनेक महिन्यांपासून स्माइल प्लसच्या माध्यमातून योगेश मालखरे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri news Smile Plus