छंदातील कलेचा जर्मनी प्रवास

रवींद्र जगधने
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

पिंपरी - छंद म्हणून जोपासलेली रनिंग मराठी, स्टेपलिंग आर्ट, मिरर इमेज लिखाण, सुंदर हस्ताक्षर, जलरंग चित्रकला व नॅनो रायटिंग या कलेतून एक उत्तम कलाकार साकार झाला. नॅनो रायटिंग या कलेने तर जर्मनीचा प्रवासही केला आहे. अजितकुमार जमदाडे असे या कलाकाराचे नाव आहे.

पिंपरी - छंद म्हणून जोपासलेली रनिंग मराठी, स्टेपलिंग आर्ट, मिरर इमेज लिखाण, सुंदर हस्ताक्षर, जलरंग चित्रकला व नॅनो रायटिंग या कलेतून एक उत्तम कलाकार साकार झाला. नॅनो रायटिंग या कलेने तर जर्मनीचा प्रवासही केला आहे. अजितकुमार जमदाडे असे या कलाकाराचे नाव आहे.

चित्रप्रदर्शन पाहून कलाकार होण्याची इच्छा बाळगणाऱ्या जमदाडे यांचा जन्म १९७०चा. सांगली जिल्ह्यातला. वडील पिंपरीतील टाटा मोटर्समध्ये नोकरीला होते. त्यामुळे अजितकुमारचे दहावीपर्यंतचे शिक्षण एच. ए. हायस्कूलमध्ये झाले. टाटा मोटर्समध्ये तांत्रिकीचे तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर पिंपरीतील जीकेएन सिंटर मेटल्स कंपनीत रुजू झाले. दरम्यान, ते बालगंधर्वमध्ये नाटक पाहण्यासाठी गेले होते. तेथील कलादालनातील चित्रकार मिलिंद मुळीक यांचे चित्रप्रदर्शन पाहिले. ते भारावून गेले. चित्रकार होण्याची इच्छा बाळगून प्रसिद्ध चित्रकारांची पुस्तके आणून चित्रे काढण्यास सुरवात केली. काढलेली चित्रे चित्रकारांना दाखवून मार्गदर्शन घेऊ लागले. बऱ्याच दिवसांच्या सरावानंतर ते उत्तम चित्रे काढू लागले.  

स्टेपलिंग चित्रकलाही अवगत
एका मासिकात स्टेपलिंग (ठिपक्‍यांनी काढलेले चित्र) कलेने साकारलेले चित्र पाहिले. त्यांनीही असे चित्रे काढण्यास सुरवात केली. 

त्यांनी पहिले चित्र तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे साकारले. त्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. सात ते आठ लाख ठिपके काढावे लागले. सात ते आठ वर्षांच्या काळात त्यांनी स्केचपेन व जेलपेनने गणपती, सांस्कृतिक, नैसर्गिक विविध चित्रे काढली. अभिनेते प्रशांत दामले, संजय नार्वेकर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना चित्रे भेट दिली. निगडीतील पवळे कला दालनात चित्रांचे प्रदर्शन भरले होते.  

नॅनो रायटिंगचा प्रवास जर्मनीपर्यंत
अजितकुमार यांनी २०१० मध्ये नॅनो अक्षरे लिहिण्यास सुरवात केली. मात्र, ही अक्षरे वाचण्यासाठी भिंगाचा वापर करावा लागतो. पाच बाय चार इंचाच्या चौकोणात त्यांनी २१ हजार रामराम अशी अक्षरे लिहिली आहेत. २०१५ मध्ये त्यांच्या कंपनीत भरविलेल्या चित्रांचे प्रदर्शन जर्मनीच्या संचालकांनी पाहिली. त्या वेळी त्यांनी नॅनो रायटिंगमध्ये त्यांची पत्नी व त्यांचे नाव असलेली कला साकारण्याची इच्छा व्यक्त केली. चार बाय चार इंचाच्या चौकोणात दीड हजार अक्षरांची कलाकृती तयार करून ती जर्मनीला पाठवली. 

मित्र मंडळींकडून मिळाली प्रेरणा 
निगडी- प्राधिकरणातील चक्रव्यूह मित्र मंडळाचे अजितकुमार सदस्य आहेत. गणेशोत्सव काळात त्यांनी विविध कला साकारून देखावे व आरास केली आहे. त्या वेळी मित्रांनी त्यांना कल्पना सुचवल्या. त्यातून प्रेरणा मिळाल्याचे अजितकुमार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news ajitkumar jamdade art hobby