अभियंत्यांची ‘मिलस्टोरी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पिंपरी - शहरात नोकरी, व्यावसायानिमित्त येणाऱ्यांना रोज उत्तम दर्जाचे जेवण मिळत नाही, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी नागपूरमधल्या तीन अभियंत्यांनी नोकरीला रामराम करून जेवण पुरवण्यासाठी ‘मिलस्टोरी’चा अनोखा ऑनलाइन फंडा सुरू केला आहे. यामध्ये एका वेळच्या जेवणाचा दर ५३ रुपये ठेवला असून, ते मोफत घरपोच करण्यात येणार आहे. शहरातील १२७ जणांनी त्यासाठी नोंदणी केली असून, त्यांना मंगळवारपासून (ता. १) या उपक्रमाला सुरवात झाली आहे. 

पिंपरी - शहरात नोकरी, व्यावसायानिमित्त येणाऱ्यांना रोज उत्तम दर्जाचे जेवण मिळत नाही, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी नागपूरमधल्या तीन अभियंत्यांनी नोकरीला रामराम करून जेवण पुरवण्यासाठी ‘मिलस्टोरी’चा अनोखा ऑनलाइन फंडा सुरू केला आहे. यामध्ये एका वेळच्या जेवणाचा दर ५३ रुपये ठेवला असून, ते मोफत घरपोच करण्यात येणार आहे. शहरातील १२७ जणांनी त्यासाठी नोंदणी केली असून, त्यांना मंगळवारपासून (ता. १) या उपक्रमाला सुरवात झाली आहे. 

शुभम राजपूत, सूरज प्रजापती, शुभांग बोबळे या तीन अभियंत्यांनी नागपुरातल्या तरुणांनी प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून शिक्षण पूर्ण केले. तिघेही जण अभ्यासात हुशार. त्यापैकी सूरज हा कॉलेजमधला, तर शुभांग हा विद्यापीठातील टॉपर. शिक्षण सुरू असतानाच ग्राहकांना दर्जेदार जेवण पुरवण्याची संकल्पना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण सुरू असताना नागपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र कालांतराने शुभमने महिंद्र राइस कंपनीत टेस्टरची, सूरजने प्रोसिटी कन्सल्टंटमधे डेव्हलपमेंट मॅनेजर आणि शुभांगने फ्लॅश इलेक्‍ट्रॉनिकमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंत्याची नोकरी पत्करली. व्यवसाय करण्याचे खूळ डोक्‍यात बसलेल्या या तिघांचे नोकरीत फार काळ मन रमले नाही. अखेरीस त्यांनी नोकरी सोडून देत पूर्णवेळ याच व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
 
उत्तम दर्जासाठी उपक्रम
ग्राहकांना एका वेळच्या जेवणाच्या डब्यासाठी सोळाशे, तर दोन वेळच्या जेवणासाठी दोन हजार ६५० रुपये खर्च येणार आहे. मोफत घरपोच सेवा देण्यासाठी सात डिलिव्हरी बॉइजची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना जेवणाच्या डब्याची आवश्‍यकता आहे, त्यांना उत्तम दर्जाचे जेवण मिळावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सूरजने स्पष्ट केले. 

हॉटेलबरोबरही करार
‘मिलस्टोरी’च्या माध्यमातून हे तरुण माफक किमतीत उत्तम दर्जाचे जेवण ग्राहकांना मोफत घरपोच देणार आहेत. या उपक्रमासाठी त्यांनी शहरातील दोन हॉटेलबरोबर करार केला असून, त्यात प्रत्येकी एका शाकाहारी आणि मांसाहारी हॉटेलचा समावेश आहे. ‘मिलस्टोरी’मध्ये देण्यात येणाऱ्या एका वेळच्या जेवणाच्या डब्यात पाच पोळ्या, एक भाजी, डाळ, भात, सॅलड आणि लोणचे यांचा समावेश राहणार आहे. याखेरीज आठवड्यातून दोन वेळा गोडपदार्थ देण्यात येणार असल्याचे शुभमने सांगितले. 

ऑनलाइन सुविधा
‘मिलस्टोरी’ संकल्पनेला शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना यामध्ये ऑनलाइन बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. रोज देण्यात येणाऱ्या जेवणाच्या डब्यातील भाज्या, पदार्थ या वेगळ्या राहणार असल्याचे शुभांगने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news engineer millstory