ओवीने अनुभवला ‘स्कूबा डायव्हिंग’चा थरार

सागर शिंगटे
बुधवार, 12 जुलै 2017

पिंपरी - विशाल समुद्राच्या पोटात अनोखी सजीवसृष्टी आणि शेकडो प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. त्या सागरी जीवसृष्टीचे पैलू पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील वडील विनय आणि त्यांची १२ वर्षीय मुलगी ओवी सातपुते या दोघांनी थायलंड येथील समुद्रात एकमेकांच्या साथीने ‘स्कूबा डायव्हिंग’चा थरार अनुभवला. या कामगिरीमुळे ओवी शहरातील पहिली सर्वांत लहान आंतरराष्ट्रीय ‘ओपन वॉटर डायव्हर’ ठरली आहे.

पिंपरी - विशाल समुद्राच्या पोटात अनोखी सजीवसृष्टी आणि शेकडो प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. त्या सागरी जीवसृष्टीचे पैलू पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील वडील विनय आणि त्यांची १२ वर्षीय मुलगी ओवी सातपुते या दोघांनी थायलंड येथील समुद्रात एकमेकांच्या साथीने ‘स्कूबा डायव्हिंग’चा थरार अनुभवला. या कामगिरीमुळे ओवी शहरातील पहिली सर्वांत लहान आंतरराष्ट्रीय ‘ओपन वॉटर डायव्हर’ ठरली आहे.

अथांग आणि विशाल समुद्र नेहमीच आबालवृद्धांचे आकर्षण ठरला आहे. त्याच्या अंतरंगाबाबतचे गूढ आजही कायम आहे. पिंपरी-चिंचवडमधील विनय आणि त्यांची मुलगी ओवी यांना त्याच्या पोटातील रहस्ये जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्‍टर्स (पॅडी) च्या पुण्यातील केंद्रामधून स्कूबा डायव्हिंगसाठी पहिल्या टप्प्याचे अधिकृत प्रशिक्षण घेतल्यावर ओवी आणि विनय सातपुते यांनी स्कूबा डायव्हिंगच्या समुद्रातील परीक्षेसाठी थायलंड येथील फुकेटची निवड केली. पिंपरी-चिंचवड ते मुंबई-बॅंकॉक आणि तेथून पुढे फुकेटपर्यंतचा दोघांचा प्रवास विमानाने झाला. फुकेट येथील सिफन डायव्हर्स या तेथील सर्वोत्तम डाइव्ह सेंटरमध्ये ते दोघे पोचले.

परीक्षक म्हणून ॲना आणि अर्जेंटिनाच्या सोफी यांनी ओवीची काळजी घेत सर्व आवश्‍यक चाचण्या घेतल्या. डाइव्हच्या दोन्ही दिवस लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. समुद्रही बऱ्यापैकी शांत होता. त्यामुळे ओवी आणि विनय यांनी दोन दिवसांत फुकेटच्या काता बीचजवळील राचा राई आणि राचा नॉई या बेटानजीक दीड तास बोटीने प्रवास करत समुद्राच्या १८ मीटर (६६ फूट) खोलीपर्यंत ६ स्कूबा डाइव्ह घेतल्या. समुद्र तळातील सागरी जीवसृष्टी आणि प्रवाळ यांचा दोघांनी जवळून अनुभव घेतला. ‘लायन फिश’,‘स्वॉर्ड फिश’,‘मोरे ईल’ यासारख्या माशांच्या निरनिराळ्या प्रजातींबरोबरच समुद्र कासव, साप यांनाही त्यांना पाहता आले. 

थायलंड येथील फिफी बेटाजवळ जहाज बुडाले होते. त्याचे निरीक्षण करण्यासाठी ओवी आणि विनय यांना तेथे जायचे होते; परंतु खराब हवामानामुळे ते रद्द झाले. ‘स्कूबा डायव्हिंग’ करताना स्वतःच्या सुरक्षेसाठी साथीदाराचीही (बडी) आवश्‍यकता असते. त्याशिवाय त्याला परवानगी दिली जात नाही. ‘स्कूबा डायव्हिंग’नंतर दोघांनीही थायलंडच्या सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचाही आस्वाद घेतला. 

मला काहीतरी नावीन्यपूर्ण करून दाखवायचे होते. ‘स्कूबा डायव्हिंग’साठी मी आणि वडील दोघेही खूप उत्साहित होतो. या प्रकारामुळे मला सागरी जीवसृष्टी जवळून पाहता आली. 
-ओवी सातपुते, स्कूबा डाइव्हर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news scuba diving