पोलिसांच्या मध्यस्थीने सावरला संसार

संदीप घिसे
बुधवार, 13 मार्च 2019

पिंपरी - पत्नीच्या तिच्या मित्रांबरोबरील सततच्या चॅटिंगमुळे पतीने अखेर न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला, तर दुसरीकडे पत्नीनेही पती छळ करीत असल्याचे निवेदन महिला तक्रार निवारण कक्षाकडे दिले. मात्र, पोलिसांनी त्या दोघांचेही समुपदेशन करत विस्कटू पाहणारा त्यांचा संसार सावरला. आता त्यांनी नव्याने संसार सुरू केला आहे. 

पिंपरी - पत्नीच्या तिच्या मित्रांबरोबरील सततच्या चॅटिंगमुळे पतीने अखेर न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला, तर दुसरीकडे पत्नीनेही पती छळ करीत असल्याचे निवेदन महिला तक्रार निवारण कक्षाकडे दिले. मात्र, पोलिसांनी त्या दोघांचेही समुपदेशन करत विस्कटू पाहणारा त्यांचा संसार सावरला. आता त्यांनी नव्याने संसार सुरू केला आहे. 

सरकारी नोकरीत उच्च पदावर असणारा पती शेखर आणि त्याची पत्नी सुमन (दोघांचेही नाव बदललेले आहे) पिंपरी चिंचवडचे निवासी. या दांपत्याचा मोठा मुलगा नववीत, तर छोटा मुलगा सहावीत. गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीच्या वर्तनात बदल झाल्याचे शेखर यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी पत्नीचा मोबाईल आपल्या मोबाईलशी पेअर केला. त्यामुळे तिला येणारे सर्व मेसेज त्यांना आपल्या मोबाईलवर दिसू लागले. तिचे तिच्या मित्राबरोबरील मेसेजचे त्याने स्क्रीनशॉट काढून ठेवले. 

त्यानंतर त्यांनी पत्नीला त्याबाबत विचारणा केली. त्यातून त्यांचे वाद सुरू झाले. त्यानंतर त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली. अखेर शेखर यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला, तर दुसरीकडे सुमन यांनीही शेखर आपला छळ करीत असल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसांत गेल्या. तथापि, गुन्हा दाखल करण्यापूर्वी समुपदेशन अनिवार्य असल्याने त्यांनी महिला तक्रार निवारण केंद्राकडे अर्ज केला. 

उपनिरीक्षक मनीषा दशवंत यांनी त्या दोघांनाही बोलावून घेतले. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. मात्र, घटस्फोटानंतर मुलांचे काय, असा प्रश्‍न त्यांनी दोघांनाही केला. सुमनला मुलांसाठी एक संधी द्यावी, असे आवाहन पोलिसांनी शेखरला केले. 

शेखरनेही केवळ मुलांसाठीच मी तुझी चूक माफ करीत असल्याचे सूमनला सांगितले. त्यानंतर घटस्फोटासाठी केलेला अर्ज पतीने मागे घेतला. आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन शेखर-सुमन आता कामाच्या ठिकाणी परराज्यात गेले आहेत. तुमच्यामुळेच आमचा पुन्हा सुखाचा संसार सुरू झाल्याची भावना त्या दांपत्याने व्यक्‍त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Family Compromise Motivation Initiative