पोलिस, तरुणांमुळे ज्येष्ठ नागरिक सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

घरातील लोकांवर नाराज होऊन ९७ वर्षांचे लक्ष्मण कृष्णाजी गवाळे हे घर सोडून आळंदीत आले होते. येथील तरुण आणि दोन पोलिसांनी त्यांना पिंपरी महापालिका हद्दीतील जुनी सांगवी येथे नातेवाइकांच्या स्वाधीन केले.

आळंदी - घरातील लोकांवर नाराज होऊन ९७ वर्षांचे लक्ष्मण कृष्णाजी गवाळे हे घर सोडून आळंदीत आले होते. येथील तरुण आणि दोन पोलिसांनी त्यांना पिंपरी महापालिका हद्दीतील जुनी सांगवी येथे नातेवाइकांच्या स्वाधीन केले.

लक्ष्मण गवाळे हे गुरुवारी  (ता. १८) सकाळपासून आळंदीतील पीएमपी बसथांब्याजवळ बसून होते. त्यांची कोणीही विचारपूस केली नाही. मात्र रात्र होत गेली आणि बसथांब्यावरील अंधार जसा गडद होत गेला तशी प्रवाशांची वर्दळ बंद झाली. रात्री दहाच्या दरम्यान विश्रांतवाडी येथील आनंद वाघमारे हे घरी जाण्यासाठी म्हणून आळंदीत बसथांब्यावर आले आणि त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. वाघमारे यांनी गवाळे यांना रिक्षातून मंदिराजवळ आणले.

माउलींचे समाधी दर्शन झाल्यानंतर बाबांची विचारपूस केल्यावर पत्ता विचारला. बाबांना पत्ताही नीट सांगता येईना. मग बाबांना येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर गुळुंजकर, विशाल येळवंडे यांनी चहा आणि पाणी प्यायला दिले. तब्बल एक तास विचारपूस केल्यानंतर बाबांनी वाशीम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावाकडच्या आणि पुण्यातील पिंपरीत येथील अशा दोन्ही विवाहित मुलींचा पत्ता सांगितला. आळंदीत ज्ञानेश्‍वर घुंडरे, आनंद वाघमारे यांनी बाबांना अखेर रात्री बाराच्या दरम्यान पोलिस ठाण्यात नेऊन हकिगत सांगितली. पोलिस ठाण्यात हवालदार नितीन बनकर यांनी बाबांना पत्ता पुन्हा विचारला. बाबांनी कोऱ्या कागदावर नाव व पत्ता लिहून दिला.

त्यानंतर हवालदार बनकर, अंकुश राठोड, ज्ञानेश्‍वर घुंडरे, आनंद वाघमारे यांनी बाबांना त्यांच्या जुन्या सांगवीतील मुलीच्या घरी नेऊन सोडले. या वेळी मुलीकडून जबाब लिहून घेतला.दरम्यान, लक्ष्मण गवाळे यांना मुलगा नसल्याने पिंपरीतील जुन्या सांगवीत त्यांची छोटी विवाहित मुलगी अनसूया यांच्याकडेच ते राहत. मात्र गुरुवारी दर्शनाला जातो असे सांगून बाबा घरच्यांवर रुसून आळंदीला आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Laxman Gawale Home Humanity Motivation