esakal | Positive Story : बारमाही भाजीपाला उत्पादनातून नियमित उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji-gaikwad

स्वतः विक्री केल्यामुळे अधिक फायदा मिळून नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे. उत्पन्नातून बचत साधत त्यांनी टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी केली आहे.

Positive Story : बारमाही भाजीपाला उत्पादनातून नियमित उत्पन्न

sakal_logo
By
माणिक रासवे

परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी संभाजी गायकवाड हे वर्षातील बारा महिने छोट्या छोट्या क्षेत्रावर विविध भाजीपाला पिके तसेच फुलांचे उत्पादन घेत आहेत. स्वतः विक्री केल्यामुळे अधिक फायदा मिळून नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे. उत्पन्नातून बचत साधत त्यांनी टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी केली आहे.

सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जोखमेमध्ये वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांनी एकीच्या जोरावर यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. भाजीपाला उत्पादनातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. परभणीपासून १५ कि.मी. अंतरावरील मिरखेल येथील संभाजी कुंडलिकराव गायकवाड हे गेल्या १५ वर्षांपासून वर्षभर भाजीपाला उत्पादन  घेत आहेत. उत्पादनासह विक्रीसाठी स्वतःची व्यवस्था असल्यामुळे अधिक फायदाही मिळवत आहेत.

हेही वाचा : फायदेशीर डाळिंब शेतीसाठी...

दुष्काळामुळे स्थलांतर  
गायकवाड यांचे मूळगाव दैठणा (ता. परभणी) हे आहे. नववीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर संभाजी सन १९९९ पासून घरच्या शेतीकामात मदत करू लागले. त्यांचे वडील कुंडलिकराव हे वडिलोपार्जित वाटून आलेली १२ गुंठे शेती व अन्य शेतकऱ्यांची कसण्यासाठी घेतलेली एक एकर यात प्रामुख्याने भाजीपाला उत्पादन घेत. आई, वडील, भाऊ सर्व जण शेतात राबत असल्याने खर्चात बचत होई. कौटुंबिक गरजा भागून शिल्लक उत्पन्नातून बचत करत. दुष्काळी स्थितीमुळे पुढे पाणी कमी पडू लागल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम होऊ लागला. यावर उपाय म्हणून जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील संभाजी यांच्या आजोळी मिरखेल (ता. परभणी) येथे टप्प्याटप्प्याने दोन एकर जमीन खरेदी  केली व ते मिरखेल येथे स्थायिक  झाले.

भाजीपाल्यातील वैविध्यपूर्ण उत्पादन
मिरखेल येथे जमीन खरेदी केल्यानंतर संभाजी यांनी सिंचनासाठी बोअरवेलची सुविधा निर्माण केली. वर्षभर विविध हंगामांत येणारा शेपू, पालक, चुका, मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडके, कारले, दुधी भोपळा, तोंडली इ. घेतात. शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवार, चवळी, वाल यांचा समावेश असतो. तर कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूट, कांदा, लसूण यांसह वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची आदी फळभाज्या घेतात. प्रत्येक पिकासाठी पाच ते दहा गुंठे, चमकोरा (आळू) पाच गुंठे, पुदिना पाच गुंठे, जळगावची भरताची वांगी अशा एकूण अडीच एकर क्षेत्रावर वर्षभर आलटून पालटून करतात.

कुटुंब राबतेय शेतात
अल्पभूधारक असल्यामुळे बैलजोडी सांभाळणे परवडत  नाही. मशागतीसह आंतरमशागतीच्या कामांसाठी मामा कुंडलिकराव थोरवट यांची बैलजोडी घेतली जाते. संभाजी यांच्यासोबत पत्नी माया, सासू छायाबाई यांची मदत होते. बारमाही भाजीपाला उत्पादन असल्यामुळे लागवड, खुरपणी, काढणी इ. कामांसाठी गरजेनुसार दोन मजूर घेतले जातात. सकाळी साडे नऊ वाजल्यापासून ते दुपारी  अडीचपर्यंत आंतरमशागतीची कामे केली जातात. तर दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाज्या काढणीचे काम केले जाते. त्यानंतर स्वच्छ, प्रतवारी केलेला भाजीपाला वाहनांमध्ये भरून ठेवला जातो. सकाळी पाचच्या सुमारास भाजीपाल्याचे वाहन मिरखेलहून परभणीस रवाना होते.

हेही वाचा : कंत्राटी शेती : फायद्याची की शोषणाची?

विक्री व्यवस्था 
पूर्वी दुचाकीवर भाजीपाला बांधून परभणी येथील वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारानजीक विक्रीसाठी बसत. यंदा छोटे वाहन खरेदी केले असून, स्वतःच्या  शेतातील भाज्यांसह अन्य शेतकऱ्यांचा भाजीपालाही विक्रीसाठी आणतात. सकाळी साडेपाच ते साडेतीन- चारपर्यंत भाजीपाल्यांची विक्री केली जाते.

फुलांचे उत्पादन 
भाजीपाल्यासोबत झेंडू, अॅस्टर, गलांडा, निशिगंध, बिजली इ. फुलझाडांची हंगामनिहाय लागवड केली जाते. भाजीपाल्यासोबत दररोज पाच ते दहा किलो फुलांचीही विक्री केली जाते. यंदा गुलाब आणि मोगरा लागवडीचे नियोजन आहे. लग्न समारंभात स्टेज सजावटीचीही कामे घेतात. त्यातून पूरक उत्पन्न मिळते.

फळझाडांची लागवड  
यंदा त्यांनी अंजीर, अॅपल बेरची प्रत्येकी १०० झाडे, लिंबू, पेरूची प्रत्येकी २० झाडे, जांभळाची ११ तर फणसाची १७ झाडे लावली आहेत. येत्या काळात भाजीपाला, फुलांसोबत फळांचे उत्पादनदेखील सुरू होईल.

हेही वाचा : ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन करणारी करार शेती

टप्प्याटप्प्याने  जमीन खरेदी
दैठणा येथे वाटून आलेल्या वडिलोपार्जित १२ गुंठे जमिनीसह अन्य शेतकऱ्यांच्या कसण्यासाठी घेतलेल्या जमिनीतून भाजीपाला लागवडीचे नियोजन बसवले. त्यातून मिळणाऱ्या फायद्यातून मिरखेल येथे दोन टप्प्यांत प्रत्येकी एक एकर व त्यानंतर २० गुंठे जमीन खरेदी केली. 

दैठणा येथे एक एकर नवीन जमीन खरेदी केली. आजोबांकडून पुन्हा पावणेतीन एकर जमीन मिळाली. यामुळे एकूण दैठणा येथे चार एकर, तर मिरखेल येथे अडीच एकर जमीन झाली. अशी एकूण दोन ठिकाणी मिळून साडेसहा एकर शेती झाली. 

मिरखेल येथील शेतीतील भाजीपाला उत्पादनातून वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळते. 

टाळेबंदीमध्ये घरपोच विक्री 
पूर्वी संभाजी गायकवाड हे परभणी येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भाजीपाला विक्री करत. मात्र या ठिकाणी पुढे अन्य शेतकरी व व्यापाऱ्यांची गर्दी वाढली. भाजीपाला विक्रीसाठी बसण्यास जागाही मिळेनाशी झाली. दरम्यानच्या काळात वाहतुकीसाठी त्यांनी अॅटोरिक्षा खरेदी केली होती. तिचाच वापर करत घरपोच विक्री सुरू केली. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील दत्तधाम परिसरातील शहरापासून दूर वसाहतींमध्ये घरपोच भाजीपाला विक्री सुरू केली. ताज्या भाजीमुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी लागू झाली. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वसाहतीमध्ये सर्व नियम पाळून घरपोच भाजीपाला विक्रीसाठी मुभा मिळाली. संभाजी गायकवाड  व त्यांचे मित्र सुदाम माने यांनी स्वतःसह अन्य शेतकऱ्यांचा भाजीपालाही विकू लागले. लाऊड स्पीकरद्वारे भाजीपाला खरेदीचे आवाहन सुरू केले. तेव्हाच्या नियमानुसार सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विक्री करत. पुढे परवानगी मिळाल्यानंतर व मागणी वाढू लागल्याने दुपारी तीनपर्यंत विक्री केली. त्या दिवसांत दररोजचा खर्च वजा जाता प्रत्येकाला ८०० ते १००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. तुलनेने अधिक दर मिळत असल्याने घरपोच भाजीपाला विक्रीचा हा प्रयोग किफायतशीर ठरला.

संभाजी गायकवाड,  ९७६३५७१५५९

loading image