लोकवर्गणीतून केले रस्त्याचे सरळीकरण

कैलास मगर
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

निल्लोड - केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. त्यांच्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.

निल्लोड - केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. त्यांच्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.

तीन वर्षापूर्वी काही युवकांनी व्हॉट्‌सॲपवर मनोरंजन म्हणून ‘आम्ही केऱ्हाळेकर’ नावाने ग्रुप सुरू केला.  हळूहळू राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह पत्रकार, शासकीय कर्मचारी ग्रुपशी जोडले गेले. ग्रुपमध्ये मनोरंजन, बिनकामाच्या गोष्टी टाळून विविध विषयांवर गंभीरतेने चर्चा होत गेली. यामध्ये गावचा विकास, जलयुक्त शिवार योजना, दुष्काळावर शेतकऱ्यांनी करावयाची मात, पाण्याचे नियोजन, ग्रामस्वच्छता, आरोग्य यावर चर्चा केली जाते. सामाजिक दृष्टिकोन ठेवून विविध उपक्रम राबविले जातात. चार वर्षापासून गावांतर्गत रस्त्याची दुर्दशा झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. दोन दिवसांत वर्गणी जमा करून जेसीबीद्वारे हा रस्ता गुळगुळीत करण्यात आला. यासाठी पुढाकार घेतलेल्या युवकांचे परिसरात कौतुक होत आहे.

सोशल मीडियाचा असाही उपयोग
सोशल मीडियाचा केवळ मनोरंजन, गप्पाटप्पांसाठी वापर न करता सकारात्मक, विकासात्मक कामासाठी उपयोग होऊ शकतो. ग्रुपच्या माध्यमातून ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल करण्याचा मनोदय सदस्यांनी बोलून दाखविला. ग्रुपमध्ये प्रकाश पाटील, सूर्यभान बन्सोड, संजय चुंगडे, आजिनाथ भिंगारे, दत्ता पांढरे, विलास शेळके, राजीव पांढरे, उध्दव गिरी, राजू राजपूत, कैलास शेळके, शंकर सोनवणे, राहुल शेळके, राजू लोखंडे, विजय कळम, आजिनाथ पांढरे, प्रकाश जोशी, प्रभाकर पवार, गणेश पांढरे, जनार्दन बोराडे, विनोद एंडोले, रमेश गंगावणे, भरत दारुंटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे.

दिव्यांगांचा सत्कार
ग्रुपतर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त गावातील दिव्यांग संजय पांढरे, ज्ञानेश्वर पांढरे, गणेश गंगावणे, रियाज शेख, आसरा पांढरे, शेख अनिस, शेख इम्रान यांचा सत्कार करण्यात आला. त्याबाबत दिव्यांगांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पोलिस पाटील संजय दारुंटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सांडूखाँ पठाण आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Donation Road Work Motivation Initiative Social Media