कल्लोळच्या पूजाने एक लाख रुपयांचा पहिला पगार दिला वृद्धाश्रमास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

चिक्कोडी - पहिल्या पगाराचा आनंद साहजिकच खूप मोठा असतो. पण, त्याची आस न धरता ती रक्कम समाजातील दुःखी, कष्टी नागरिक व समाजहितासाठी वापरण्यास द्यावी, अशी मानसिकता आताच्या युवापिढीत दुर्मिळ आहे. पण, कल्लोळ (ता. चिक्कोडी) येथील पूजा शिवाजी बेन्नूरकर या युवतीने एक लाख १०१ रुपयांचा पहिला पगार वृद्धाश्रमाला देऊन आदर्श निर्माण केला आहे.

बी. ई. पूर्ण केल्यानंतर पूजाला पुण्यातील एका नामवंत कंपनीत नोकरी मिळाली. तिचा पहिला पगार हाती येताच तो समाजकार्यासाठी देणार असल्याचा मानस आई विजया, वडील 
शिवाजी, भाऊ कृष्णा यांच्यासमोर मांडला. त्यांनीही त्याला संमती दिली. त्यांनी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील व दत्तवाड येथील बबन चौगुले यांचे मार्गदर्शन घेतले. त्यातून घोसरवाड येथे सुरु असलेल्या जानकी वृध्दाश्रमाला ही देणगी देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत ही देणगीची रक्कम वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक बाबासाहेब पुजारी यांचेकडे देण्यात आली. यावेळी कुरुंदवाड येथील भीमराव चिंचवाडे यांनीही वृध्दाश्रमाला ७ हजार रुपयाची देणगी दिली. यावेळी बाळासाहेब पाटील, बबन चौगुले यांनीही पुढील काळात वृध्दाश्रमाला मदत करण्याचे आश्‍वासन दिले. 

समाजातील अनेक जण दुःखी, कष्टी आहेत. या पुढील काळातही अशा लोकांची आपल्यापरीने सेवा करण्याचा मानस आहे.
- पूजा शिवाजी बेन्नूरकर,
कल्लोळ

युवापिढीसमोर वेगळा आदर्श
नोकरी मिळाली की पहिले वेतन देवासाठी, आई, वडिलांसाठी देण्याची मानसिकता वाढत असताना कल्लोळ येथील या युवतीने आई, वडिलांच्या सहकार्याने आपले पहिले वेतन घोसरवाड येथील वृध्दाश्रमाला स्वखुशीने भेट दिले. आपणही समाजाचे काही देणे लागतो ही पूजा बेन्नूरकरची भावना युवापिढीसमोर वेगळा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puja give his one lakh rs salary to old age home