ऊस तोडला; पण शिक्षण सोडले नाही! - उद्योजक डॉ. अशोक खाडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

सोमेश्वरनगर (जि. पुणे) - ‘‘जन्म झाला तेव्हा शेकायचीपण सोय नव्हती. फाटकी कपडे घालून खर्डा-भाकरी खात शिकलो. दहावीच्या परीक्षेला शिक्षकांनीच कपडे घेऊन दिली. आईसोबत भांगलायला, ऊस तोडायला जायचो. तरीही जिद्दीनं शिकत होतो; कारण आईला फाटक्‍या लुगड्यात बघू शकत नव्हतो. परिस्थितीच्या बरगड्या लवकरात लवकर मोडल्या पाहिजेत, हे मनाशी पक्कं होतं,’’ अशा शब्दांत ‘दास ऑफशोर’ कंपनीचे मालक डॉ. अशोक खाडे यांनी आपला शालेय जीवनातील संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडला.

सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आणि भारत ज्ञान-विज्ञान समुदाय संघटना यांच्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिरात डॉ. खाडे यांची प्रा. अजय दरेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. डॉ. खाडे म्हणाले, ‘‘गरिबीने आईचे बेकार हाल झाले. वडील सांगायचे, दुष्काळ मी घेऊन आलेलो नाही.

गाडगी-मडकी मोडू; पण शिकायची काळजी कर.’’ मलाही तुमच्यासारखी स्वप्न पडायची; पण माझ्या आईचीच स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द होती. दहावीच्या पहिल्या पेपरला सरांनी ड्रेस शिवून दिला. शेवटच्या पेपरपर्यंत तोच वापरला. दहावीत पहिला आलो. नंतर इंजिनिअर होऊन चांगल्या नोकरीला लागलो. जर्मनीला विमानाने पहिल्यांदा निघालो, तेव्हा टाय आणि कोट नव्हता. आता लाखात पगार घेणारे दीडशे इंजिनिअर आणि एकूण तीन हजार माणसं माझ्याकडे आहेत.’’

‘‘समुद्राखालील खोल विहिरीतून तेल काढणारी सामग्री माझ्याकडे आहे. दुबईचे राजे शेख महंमद बिन खलिफा माझे पार्टनर आहेत; पण त्यांच्या राजवाड्यात खर्डाच खातो. तुम्हीही मोठे झालात तर घर व गावही सुधारा. मराठी माणूस आळंदी-पंढरपूर आणि दर महिन्याचे सण, श्रावण, दिवाळी, लग्न याबाबत जास्तच जागरूक असल्याने तो उद्योगात मागे आहे. धंदा करण्यासाठी धीर, प्रामाणिकपणा, कौशल्य, नेतृत्वक्षमता, नम्रता लागते,’’ असेही त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news dr ashok khade success story