खऱ्या "पॅडमॅन'ने घडविली लोकचळवळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे - महिलांची मासिक पाळी, सॅनेटरी नॅपकिन, या काळात घ्यावी लागणारी काळजी या सर्व गोष्टींबाबत जनजागृती करण्याचे काम वर्धा जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातील खरा "पॅडमॅन' प्रशांत साठे हा युवक करीत आहे. महिला आरोग्यासाठीची या तरुणाची धडपड आणि प्रयोगशीलता संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत बनली आहे.

पुणे - महिलांची मासिक पाळी, सॅनेटरी नॅपकिन, या काळात घ्यावी लागणारी काळजी या सर्व गोष्टींबाबत जनजागृती करण्याचे काम वर्धा जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातील खरा "पॅडमॅन' प्रशांत साठे हा युवक करीत आहे. महिला आरोग्यासाठीची या तरुणाची धडपड आणि प्रयोगशीलता संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत बनली आहे.

"पॅडमॅन' चित्रपट उद्या (शुक्रवार) प्रदर्शित होत आहे. पण हाच अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन एक खेड्यातील तरुण गेले वर्षभर झटतो आहे. मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत प्रशांत हे काम करत आहे. या कामाचे बीज त्याने वर्धा जिल्ह्यातील भिडी या छोट्या खेड्यात रोवले आहे. त्याचा प्रसार आता आसपासच्या जिल्ह्यांतही होऊ लागला आहे.

मासिक पाळी हा विषय सर्वच स्तरांतून अत्यंत नाजूकरीत्या हाताळला जातो. प्रशांतने हजारो महिलांसमोर आपल्या व्याख्यानातून या विषयावर जनजागृती केली. मासिक पाळी हा एक आजार नसून, नैसर्गिक प्रक्रियेपासून ते सॅनेटरी नॅपकीनचा वापर कसा करायचा याची माहिती त्याने गावोगाव पोचविली. इतकेच नाही तर त्यासाठी त्याने सामाजिक संस्था आणि सरकारी यंत्रणेच्या मदतीने सॅनेटरी नॅपकिन वाटण्याचा उपक्रम हाती घेतला. हे नॅपकिन अल्पदरात पोचविण्याचे काम विविध यंत्रणांच्या मदतीने तो करीत आहे. त्यामुळे सॅनेटरी नॅपकिन वापरण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन या मिशन अंतर्गत प्रशांत महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी गावागावात सभा भरवत असे. या सभेमध्ये तो आरोग्य, शिक्षण, उपजीविका या विषयांवर चर्चा करत असे. काही वेळेस प्रत्येक सभेला हजर असणाऱ्या महिला महिन्यातील काही दिवस अनुपस्थितीत असल्याचे त्याच्या लक्षात आले. याचे कारण शोधल्यावर त्याच्या लक्षात आले, की मासिक पाळीमुळे या महिला सभेत येत नाही. त्यामुळे या विषयावर महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजे असा निर्णय त्याने घेतला. त्यातून सॅनेटरी नॅपकिन अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला.

महिलांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. सॅनेटरी नॅपकिनच्या माध्यमातून महिलांना बोलते करता आले, त्यांच्यात आरोग्याविषयी जागृती निर्माण करता आली. या कामात माझ्या एकट्याचे योगदान नाही तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नयना गुंडे, करुणा जुईकर, देवकुमार कांबळे, शीला कोल्हे, शालिनी भगत, कुणाल भांबरे या सर्वांचे महत्त्वाचे योगदान आहे.
- प्रशांत साठे, जनजागृती करणारा तरुण

"स्मार्ट सखी'द्वारे विक्री
या उपक्रमासाठी लागणारी पॅड गुजरात- इंदूरमधून मागवली जातात. "स्मार्ट सखी' नावाने गावातील महिलांना या पॅड्‌सची विक्री होते. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत दहा हजार सॅनेटरी पॅड्‌सची विक्री करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये म्हणून या उपक्रमाच्या सुरवातीलाच या सॅनेटरी पॅड्‌सच्या सुरक्षिततेची खात्री करून घेण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news padman prashant sathe health care women