नियतीचं कोडं सोडविण्यासाठी संघर्ष करणारी पूनम

नंदकुमार सुतार
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - लहानपणीच आई गेली, आजीनं सांभाळलं; पण नियतीनं तिलाही हिरावून घेतलं. पहाटे उठून कचरा, भंगारात भाकरीचा शोध सुरू झाला. सातवीनंतर सरस्वतीनंही पाठ फिरवली. बालपणीच गळ्यात डोरलं आलं. नियतीचा खेळ इथपर्यंतही थांबलेला नव्हता. पोटात बीज वाढत असताना वेडसर पती सोडून गेला तो परतलाच नाही. लोकांनी दिलेलं खाऊन जगण्याची लढाई सुरू झाली... ती आजही सुरू आहे. 

पुणे - लहानपणीच आई गेली, आजीनं सांभाळलं; पण नियतीनं तिलाही हिरावून घेतलं. पहाटे उठून कचरा, भंगारात भाकरीचा शोध सुरू झाला. सातवीनंतर सरस्वतीनंही पाठ फिरवली. बालपणीच गळ्यात डोरलं आलं. नियतीचा खेळ इथपर्यंतही थांबलेला नव्हता. पोटात बीज वाढत असताना वेडसर पती सोडून गेला तो परतलाच नाही. लोकांनी दिलेलं खाऊन जगण्याची लढाई सुरू झाली... ती आजही सुरू आहे. 

धुणी-भांडी अन्‌ कचरा वेचण्याचं काम करून ‘ती’ची लढाई सुरू आहे. आपल्या मुलीचा ‘बाबा’ही बनून तिला शिकण्यासाठी ती बळ देत आहे. पतीला शोधत आहे, शवागृहात तरी त्याचं दर्शन होईल म्हणून तिथंही चकरा मारते आहे. या लढाईत तिला दिलासा हवाय समाजाचा. ‘एकटी बाई’ म्हणून हिणवण्यापेक्षा माझ्या धडपडीची साधी दखल तरी घ्यावी, अशी तिची माफक अपेक्षा आहे.

पूनम गायकवाड.. अपर इंदिरानगर येथील झोपडपट्टीत तिचं घरं. घर म्हणायचं तर एक छोटी खोलीच. त्यात ती आणि तिची मुलगी राहतेय. खरं तर जगण्यासाठी संघर्ष कुणालाच चुकलेला नाही, हा जगरहाटीचा नियम माहीत असला, तरी माया, सुख आपल्या वाट्याला कधीच का न यावे, ही वेदना तिला असह्य करतेय. ही व्यथा सांगताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. ती म्हणाली, ‘‘खरं तर पती अचानक निघून गेल्यानंतर मी कोलमडून गेले होते. आयुष्याची लढाई हरले म्हणून मी आत्महत्या करण्याचा विचार केला. फरशी पुसण्यासाठी ज्यांच्याकडे जायचे, त्या प्रभाकर काकांनी मला आधार दिला. ते समजावून सांगायचे. माझ्या पाठीमागे असलेल्या मुलीच्या जबाबदारीची ते सतत जाणीव करून देत. काळ पुढे सरकत गेला आणि दुर्दैवाने तेही गेले, माझा मानसिक आधार गेला. धुणी-भांडी करत असताना एखादी नोकरी करण्याचा प्रयत्न करीत होते. अनेकांकडे गयावया केली; पण अल्प शिक्षण असल्यानं कोणी साथ दिली नाही.’’ 

तिची मुलगी आता पाचव्या वर्गात शिकत आहे. सिंहगड रस्त्यावरील एका शाळेत ती शिकते. आता तिला मोठं करण्यातच माझं आयुष्य सार्थकी लावण्याचं मी ठरवलंय, असं सांगताना पूनम म्हणाली, ‘‘धुणं-भांडी आणि कचरा गोळा करण्याच्या कामाचे ६ ते ७ हजार रुपये मिळतात. मुलीच्या शाळेत जेवणाची सोय आहे; पण तिने एखादी अपेक्षा व्यक्त केली, की ती पूर्ण करण्याची माझी ऐपत नसल्याने मी व्यथित होते. तरीदेखील तिला हवं ते मिळवून देण्यासाठी धडपड करते. आम्ही दोघी कुठं फिरायला गेल्यावर दुसऱ्यांचे बाबा पाहिल्यावर ‘आई, आपले बाबा कधी येणार?’ असं ती विचारते तेव्हा रडू कोसळतं. आता ते कदाचित येणारही नाहीत; पण मृत्यूनंतर तरी त्यांचा चेहरा बघायला मिळेल म्हणून मी अजूनही शवागृहांत जाते. आम्ही एकट्या असल्याने समाजाकडून अवहेलना होते, मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचेय; पण तशी संधी मिळाली पाहिजे.’’ किती आश्‍वासक आहे पूनम! 

स्कूल व्हॅन घ्यायचीय 
धुणीभांडी करूनच मी माझं व मुलीचं पोट भरतेय. आजपर्यंत त्यानंच माझं आयुष्य पुढे नेलंय. त्यामुळे या कामाला मी कमी लेखत नाही; पण मला स्वतःला सिद्ध करायचंय. मला माझ्यावर विश्‍वास आहे. मला स्कूल व्हॅन चालवायचीय. त्यासाठी मी नुकताच कार चालविण्याचा कोर्सही पूर्ण केलाय; पण माझ्याकडं काहीच नसल्यानं कोणी कर्ज देत नाही. मला स्कूल व्हॅन घ्यायची आहे, त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. 

पूनमला मदत करायचीय? त्यासाठी संपर्क क्रमांक : ७४४७४८६२५०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news poonam gaikwad story life style help