न्यायधीशांनी स्वीकारले गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

एक लाखाची मदत; पुढील शिक्षणाचा भार उचलणार
रत्नागिरी - न्यायदानाचे काम करणाऱ्या 30 न्यायधीशांनी राजापूर व खेड येथील दोन गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून जिल्ह्याच्या इतिहासात न्यायदानासह मदतीचा नवा पायंडा पाडला आहे. या दोन विद्यार्थ्यांना एक लाखाची आर्थिक मदत व त्यांच्या पुढील शिक्षणाचा भार उचलला आहे.

एक लाखाची मदत; पुढील शिक्षणाचा भार उचलणार
रत्नागिरी - न्यायदानाचे काम करणाऱ्या 30 न्यायधीशांनी राजापूर व खेड येथील दोन गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून जिल्ह्याच्या इतिहासात न्यायदानासह मदतीचा नवा पायंडा पाडला आहे. या दोन विद्यार्थ्यांना एक लाखाची आर्थिक मदत व त्यांच्या पुढील शिक्षणाचा भार उचलला आहे.

जिल्ह्यातील तीस न्यायाधीशांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या सर्व न्यायधीशांनी जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. यातील एक गोवळ (ता. राजापूर) येथील मीनल प्रकाश हातणकर ही असून, तिने दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळवले. तिचे आई-वडील मोलमजुरी करतात; तर खेड तालुक्‍यातील 80 टक्के गुण मिळवणारा कुरवळ-जावळीचा शुभम लाड हा दुसरा विद्यार्थी आहे. अपंगत्व, एका डोळ्याने दिसत नसतानाही शुभमने हे यश मिळविले. त्याच्याही कुटुंबीयांसमोर शुभमच्या पुढील शिक्षणाचा प्रश्‍न उभा होता.

दहावीच्या निकालानंतर वर्तमानपत्रांतून या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आणि त्यांची पुढील शिक्षणाची बिकट वाट वाचून रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. डिगे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करता येईल का, या विचारातून जिल्ह्यातील सहकारी न्यायधीशांसमोर भावना व्यक्त केल्या. त्या वेळी जिल्ह्यातील तीस न्यायधीशांच्या मदतीने मीनल आणि शुभमला शिक्षणासाठी एक लाखाची आर्थिक मदत केली. एवढ्यावर न थांबता दोन्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च व शुभमचा वैद्यकीय खर्चदेखील हे न्यायाधीश करणार आहेत.

पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च देताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. डिगे, जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग 1)चे जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश (वर्ग 2) व्ही. ए. दीक्षित आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri konkan news The guardians of the poor students accepted by the judges