रिक्षाचालक देतो अंध, अपंगांना मोफत सेवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील हरिशचंद्र जाधव हे रिक्षाचालक सहा वर्षांपासून अंध आणि अपंगांना मोफत रिक्षा सेवा देतात. जाधव यांच्यामुळे "खरा तो एकीच धर्म जगाला प्रेम अर्पावे' या ओळींची प्रचिती येते.

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील हरिशचंद्र जाधव हे रिक्षाचालक सहा वर्षांपासून अंध आणि अपंगांना मोफत रिक्षा सेवा देतात. जाधव यांच्यामुळे "खरा तो एकीच धर्म जगाला प्रेम अर्पावे' या ओळींची प्रचिती येते.

जाधव यांचा स्वत:ची रिक्षा (एमएच20 डीसी 2286) आहे. चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप, बस स्थानक किंवा चिकलठाणा ते शेंद्रा अशा दोन मार्गांवर ते रोज व्यवसाय करतात. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेने जाधव यांचा अंध आणि अपंगांना मोफत प्रवास देण्याचा उपक्रम सध्या चर्चेचा विषय आहे. सहा वर्षांपूर्वी जालना रस्त्यावर एक अंध व्यक्ती रिक्षात बसला, रामनगर येथे उतरताना त्याने पंधरा रुपये रिक्षा भाडे दिले; मात्र त्याने दिलेल्या रकमेत पंधरा कॉइन होते. त्याने ही रक्कम भीक मागून गोळा केलेली असल्याचे लक्षात आले.

त्याचवेळी खूप वाईट वाटले, असे जाधव सांगतात. त्या अंध व्यक्तीला त्याची रक्कम परत करून त्याचदिवशी अंध आणि अपंगांसाठी मोफत सेवा देण्याचा निर्धार त्यांनी केला. प्रवाशांनाही हे समजावे, यासाठी रिक्षावर त्यांनी मोठ्या अक्षरात "अंध अपंगांना मोफत सेवा' असे लिहिले आहे. रोज तीन ते पाच जण अंध-अपंग भेटतात, ते पैसेही देतात; मात्र मी त्यांच्याकडून पैसे घेत नाही, असे जाधव अभिमानाने सांगतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांसाठी पणाला लावले. त्यांच्यामुळे आपण जर उभे आहोत, तर आपलेही कर्तव्य आहे. म्हणूनच कुटुंब चालवून जे शक्‍य आहे ते आपण सहज करू शकतो, असे जाधव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rickshaw driver blid handicapped people free service harishchandra jadhav