गरजू रुग्णांची शुश्रूषा करताहेत 'केअरटेकर'

राजेश सोनवणे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सद्यःस्थितीत बारा जणांकडे सेवा 
संपर्क फाउंडेशन गेल्या वर्षापासून आपल्या कार्याला सुरवात केली. यामध्ये 18 अप्रशिक्षित, 8 अर्धप्रशिक्षित आणि 1 पूर्ण प्रशिक्षित सेवक (केअरटेकर) नेमण्यात आले आहे. फाउंडेशनतर्फे सुरवातीला म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत प्रतिदिवशी दहा जणांकडे सेवा पुरविली. तर सध्या स्थितीत शहरातील बारा रुग्णांच्या घरी जाऊन सेवा दिली जात आहे.

जळगाव - रूग्णासाठी डॉक्‍टर देवाप्रमाणे असतात. रूग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून सेवा देणारे डॉक्‍टर आहेत. याच डॉक्‍टरांमागे उभे राहून सेवाभावी वृत्तीने रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिका असतात. तसेच प्रत्येक खासगी किंवा शासकीय रुग्णालयात वॉर्डबॉय देखील हे काम करत असतो. अशाच सेवाभावी वृत्तीने रूग्णाची सेवा व त्यांची देखभाल करण्यासाठी हॉस्पिटलमध्येच नव्हे; तर रुग्णाच्या घरी जाऊन सेवा देण्याचे कार्य संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. 

रूग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा मानली जाते. हे ब्रीद प्रामुख्याने रूग्णालयांमध्ये डॉक्‍टरांसाठी मानले जाते. शिवाय रूग्णालयात काम करणारे नर्स, वॉर्डबॉय हे देखील यात धन्यता मानतात. परंतु, आता रुग्णालयाबाहेर म्हणजे घरी जाऊन रूग्णसेवा दिली जात आहे. संपर्क फाउंडेशन यामधील दुवा ठरत असून, वर्षभरापासून शहरात आपले कार्य विस्तारत आहे. गतवर्षी 12 मार्च 2018 फाउंडेशनला मान्यता मिळाल्यानंतर नऊ जणांनी मिळून 13 ऑगस्ट 2018 पासून शहरात नर्सेस, वॉर्डबॉय यांच्यामार्फत रुग्णाच्या घरापर्यंत पोचून रुग्णसेवा देण्याचे कार्य करत आहे. फाउंडेशनमध्ये पुरूषोत्तम न्याती, तुषार तोतला, रवींद्र लढ्ढा, डॉ. अमित चौधरी, डॉ. स्नेहल फेगडे, राजीव नारखेडे, चेतन नन्नवरे, नंदकुमार जैस्वाल, चेतन दहाड, विशाल चोरडिया, इमीद मेनन, प्रसन्न मांडे काम सांभाळतात. 

तीन कॅटेगिरीतून सेवा 
म्हातारपण किंवा आजारी रूग्णाची काळजी घेण्यासाठी घरातील सदस्य उपस्थित नसल्यास किंवा एकटे असणाऱ्यांच्या घरी जाऊन संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात घरपोच रूग्णसेवा पुरविली जात आहे. ही सेवा पूर्ण प्रशिक्षित, अर्ध प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित अशा तीन कॅटेगिरीतील सेवेकरींच्या (केअरटेकर) माध्यमातून दिली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने स्त्री रूग्ण असल्यास त्यांच्या घरी स्त्री परिचारिका आणि पुरूष रूग्णाच्या सेवेत पुरूष आरोग्य सेवक पाठविले जातात. याकरिता शहरातील खासगी रूग्णालयात काम करणारे वॉर्डबॉय किंवा नर्सेस या ओव्हर टाइम म्हणून सेवा करत आहेत. 

रुग्णालयाप्रमाणे शिफ्ट 
रुग्णालयात रुग्णांच्या देखरेखीसाठी सेवक तीन शिफ्टमध्ये काम करत असतात. त्यानुसारच संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणारे सेवक हे तीन शिफ्टमध्ये उपलब्ध करून दिले जातात. यात अप्रशिक्षित असलेल्या सेवकासाठी दिवसाच्या शिफ्टसाठी 250 रुपये, रात्रीच्या शिफ्टसाठी 300 रूपये चार्जेस रूग्णाकडून घेतले जातात. तर प्रशिक्षित सेवकासाठी दिवसा 1 हजार 800 आणि रात्रपाळीसाठी 2 हजार 400 रूपये इतके चार्जेस घेतले जातात.
 
संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून घरी जाऊन रूग्णसेवा दिली जात आहे. सद्यस्थितीला शहरातील बारा जणांकडे सेवा पुरविण्याचे काम केले आहे. 
- पुरुषोत्तम न्याती, संपर्क फाउंडेशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sampark foundation patient caretaker Humanity Motivation