अभियंता नोकरी सोडून करतोय चाळीस देशी गाईंचे संगोपन 

राजकुमार चौगुले
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

देशी गाईंची संख्या वाढविताना गोमूत्र व शेण यांचीही उपलब्धता मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्याचा पुरेपूर विनियोग करीत निमशिरगाव (जि. कोल्हापूर) येथे नितीन अोझा या अभियंता तरुणाने विविध उत्पादनांची निर्मिती करीत या बाजारपेठेची क्षमता किती मोठी आहे याचा प्रत्ययच शेतकऱ्यांना दिला आहे. सर्व उत्पादनांना जागेवरच मार्केट मिळविले आहे.

मूळ सांगली येथील असलेले नीतेश ओझा (वय ३०) यांनी बीई कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले. सन २००३ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका प्रसिद्ध कंपनीत काम केले. त्यानंतर पुण्यात स्वतःची संगणक व्यवसायातील कंपनी स्थापून व्यवसायाला सुरवात केली. या काळात कामामुळे जीवनशैली बदलली. आहाराकडे व्यवस्थित लक्ष देणे शक्य होत नसे. पैसे मिळत पण सुख, शांती आणि समाधान नाहीसे झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सन २००५ च्या दरम्यान स्वदेशी उत्पादनांचे पुरस्कर्ते कै. राजीव दीक्षित यांच्या विचारांचा प्रभाव पडत गेला. मग पुणे सोडून त्यांनी आपले गाव सांगली गाठले. विचारविनिमय केल्यानंतर देशी गाईंचं संगोपन व दूध विक्री व्यवसाय करण्याचे ठरवले. याला घरातून विरोध झाला. तरीही न डगमगता व्यवसाय सुरू ठेवला. 

भाडेतत्त्वावरील जागेत व्यवसाय
गोसंगोपनाला गांभीर्यानं सुरवात केली. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाई किंवा कायदेशीर प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या ज्या देशी गाई गोरक्षकांना दिल्या जातात, त्यातील १२ खिलार भाकड गाई नीतेश यांनी सनदशीर मार्गाने खरेदी केल्या. त्या सांभाळण्यासाठी जागेची आवश्‍यकता होती. कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगावजवळच्या (ता. हातकणंगले) डोंगरकडेला चार एकर जमीन १५ वर्षांच्या कराराने वार्षिक एक लाख २० हजार रुपये भाडेतत्त्वावर घेतली.

गोठ्याचे व्यवस्थापन  
खिलार जातीच्या भाकड देशी गाईंसाठी मुक्त आणि बांधीव गोठा उभा केला. दररोज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान गाई डोंगरावर चरायला नेल्या जातात. सायंकाळी पाच वाजता परत आल्यानंतर त्यांना सकस हिरवा चारा दिला जातो. यासाठी दीड एकरात गवतवर्गीय चारा पिकाची लागवड करण्यात आली आहे. योग्य आहाराचे व्यवस्थापन आणि औषोधोपचार केल्याने सुरवातीला आणलेल्या १२ गाईंपैकी सात गाई माजावर येऊन गाभण गेल्या. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत नऊ गाईंची पैदास गोठ्यातच झाली आहे. आज गोठ्यात सुमारे ४० गाई आहेत. 

शेण, गोमूत्रापासून उप-उत्पादने  
खिलार गाई सांभाळण्यास घेतल्या असल्या तरी त्यांची खरेदी- विक्री करून नफा मिळविण्याचा मुख्य उद्देश नव्हता. गाईंची संख्या वाढली तशी शेण व गोमूत्रही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. त्यातून मग विविध उत्पादनांची निर्मिती सुरू केली. 

जागेवरच मार्केट 
विविध राज्यांत प्रशिक्षणासाठी जाण्याचा अनुभव नितीन यांना बाजारपेठ तयार करण्यासाठी उपयोगी पडला. देशभरात आपला संपर्क वाढल्याचे ते सांगतात. त्यातूनच ग्राहक जागेवर येऊन उत्पादनांची खरेदी करतात. यात रुग्णांची संख्याही बरीच असते. मागील वर्षी सुमारे १६ लाख रूपयांची उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले. गाईंचे संगोपन चांगल्या प्रकारे केल्यास, उत्पादनांचा दर्जा ठेवल्यास व बाजारपेठेचा विस्तार केल्यास एक गाय वर्षाला सुमारे ५० हजार ते एक लाख रुपयांचे उत्पन्न देऊ शकते, असे नीतेश   सांगतात. 

बाजारपेठ व विक्री 
अलीकडील काळात देशी दुधापासून तूपनिर्मिती करण्यावर अनेकांनी भर दिला आहे. आरोग्यदायी घटक म्हणून त्यास ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. नीतेशदेखील तुपाची निर्मिती करतात. अडीच हजार रुपये प्रति किलोने विक्री होते. या तुपाचे मूल्यवर्धन करून त्याचे अौषधी मूल्य वाढविण्यात आले आहे. त्याची विक्री तब्बल पंचवीस हजार रुपये प्रति किलो दराने होते, असा दावा नीतेश यांनी केला. 

असे मूल्यवर्धित तूप वर्षाला सात ते आठ किलोपर्यंत तयार होते. सेंद्रिय शेतीसाठी खास करून गोमूत्राचा वापर काहीजण करतात. ते प्रति लिटर १५० व त्यापुढील दराने विकले जाते. 

प्रशिक्षणाची सुविधा  
महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतील गोशाळांना नीतेश यांनी प्रशिक्षण दिले आहे. इतरांच्या दान दिलेल्या रकमेवर अवलंबून न राहता गोशाळांनी स्वावलंबी व्हावे हा या प्रशिक्षणामागील मुख्य हेतू असतो. वेदखिलार गोशाळा व पंचगव्ये संशोधन केंद्र या नावाने ते आपली ही फर्म चालवितात.  

व्यवसायातील ठळक बाबी 
गेल्या दहा वर्षांत नीतेश यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात साडेतीनशे बैलजोड्या निःशुल्क वाटल्या
अडीच हजार गाईंचे गरजूंना निःशुल्क वाटप केले
गाईंची खरेदी- विक्री न करता उपपदार्थ हेच उत्पन्नाचे साधन ठेवले
उत्पादने तयार करताना त्याच्या दर्जाकडे विशेष लक्ष
संपूर्ण व्यवस्थापनासाठी एका कुटुंबाची गोठ्याच्या ठिकाणी व्यवस्था  

अशी आहेत ही उत्पादने 
मुख्य उत्पादने- गोमूत्र अर्क व घनवटी (गोळ्या) 
गोमय भस्म, दंतमंजन, धूपकांडी, गोमय लेप, मच्छर कॉइल, शाम्पू, वेदनाशामक तेल, पंचगव्य

प्रक्रियेतील काही बाबी 
दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी गोमूत्र काढले जाते. ऊर्ध्वपातन प्रक्रिया करताना मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात येतो. वर्षभर विविध उत्पादने तयार करण्याचं काम सुरू असते. वर्षभरात साधारणपणे चार हजार लिटर गोमूत्रावर प्रक्रिया केली जाते. अतिरिक्त शेणाची विक्री केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news Cow Nitesh Ojha Engineer