पुण्यातील तरुण बनवतोय जुन्या वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून उपयुक्त वस्तू

नीला शर्मा 
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

सृजन नीला हरिहर हा तरुण जुन्या वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून उपयुक्त वस्तू बनवतो.  बसण्यासाठी वापरायला आसन, झोपण्यासाठी चटई, पेन स्टॅण्ड व बाउल यांसारख्या वस्तू तो तयार करतो. 

सृजन नीला हरिहर हा तरुण जुन्या वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून उपयुक्त वस्तू बनवतो. बसण्यासाठी वापरायला आसन, झोपण्यासाठी चटई, पेन स्टॅण्ड व बाउल यांसारख्या वस्तू तो तयार करतो. अलीकडेच बारावीची  परीक्षा दिल्यानंतर मिळालेल्या सुट्टीत त्याने कागद कातरकाम प्रकारातून विविध कलाकृतीही बनवल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सृजनने अलीकडेच बारावीची परीक्षा दिली. नंतर मिळालेल्या सुट्टीत घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी एखादं साधन बनवूया असा विचार त्याने केला. तो म्हणाला, ""एका पोत्यात मी जुनी वर्तमानपत्रं भरली. काही दगडही भरले. वेट लिफ्टिंगसाठी मी तयार केलेलं मजेशीर साधन तयार झालं होतं. काही दिवस मी याच्या साह्याने व्यायाम केला. दुसरं काही तरी करून पाहायची इच्छा झाली. पण, पोत्यात भरलेल्या रद्दीचाही उपयोग वेगळ्या प्रकारे करून पाहायचा विचार केला. माझी आई नीला आपटे बालशिक्षणाचं काम करते. ती खूप प्रयोगशील आहे. ती वर्तमानपत्रांच्या फेरवापरातून निरनिराळ्या उपयुक्त वस्तू बनवते. मीही तिचं पाहून काही वस्तू करायला सुरवात केली. तिला कागदांची गुंडाळी करून, त्या दाबून पट्ट्या करताना पहात असतो. या पट्ट्या विणून ती छोटे चौरस तयार करते. मी तेच तंत्र वापरून बसण्यासाठी आसनं (बसकर) तयार केलं. मग उत्साह वाढला. पाच फूट उंचीचा माणूस सहज झोपू शकेल, एवढी लांब-रुंद चटई तयार केली. कागदाच्या पट्ट्यांपासूनच पेन स्टॅण्ड व बाउल सुद्धा बनवले.'' 

सृजनने असंही सांगितलं की, कागदाचं कातरकाम (किरिगामी) करून मी अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. बरेचसे लोक इंटरनेटवर तयार मिळणाऱ्या नक्षीचे प्रिंटआऊट घेतात. त्याप्रमाणे कापून कातरकाम करतात. मी स्वतः माझी डिझाईन्स तयार करून किरिगामी केल्याचं मला मोठं समाधान आहे. याचं एक कारण म्हणजे मी चित्रकलेचा सरावही खूप करतो आहे. उत्तम चित्रं कशी काढायची, ते दहावीपर्यंत जमलं नाही. आता ठरवून मी वेगवेगळ्या तऱ्हेने चित्रं काढत पुढे जातो आहे. तूर्तास रेखाचित्रांचाच भरपूर सराव करतो आहे. लवकरच चित्रं रंगवण्यातली गंमतही अनुभवणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarjan makes useful items from old newspapers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: