सातारा ः हरवलेले पाकीट सोशल मीडियामुळे परत, जवान व गुरुजींची तत्परता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

श्री. कोरडे हे प्राथमिक शिक्षक बॅंकेत संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पाकिटात असणाऱ्या पॅनकार्ड व आधारकार्डचा फोटो काढून लगलीच ते फोटो या परिसरातील "वेलकम फ्रेंड्‌स' या आपल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरली केले. त्यानंतर काही वेळातच या ग्रुपवरून माहिती मिळाली की, ते पाकीट चिंचणी येथील एका युवकाचे आहे. त्याच्याशी संपर्क साधून श्री. कोरडे व त्यांचे बंधू गणेश कोरडे यांनी हे पाकीट श्री. खुरासणे यांच्या ताब्यात दिले. 

कोंडवे (जि. सातारा) ः सोशल मीडिया आणि जवान व गुरुजींचा प्रामाणिकपणा यामुळे एका व्यक्तीचे महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असलेले हरवलेले पाकीट परत मिळाले आहे. त्यामुळे जवान आणि गुरुजींचे कौतुक होत आहे, तद्वत सोशल मीडियाचाही उपयोग अधोरेखित होताना दिसत आहे. 

सोशल मीडिया म्हटले की डोळ्यासमोर येते ती म्हणजे तरुणाई दिवस-रात्र मोबाईलवर गेम्स खेळणे, चॅटिंग करणे, करमणूक करणे, नको ते व्हिडिओज पाहणे. पण, काही ठिकाणी याच सोशल मीडियाच्या माध्यमातून हाच तरुण वर्ग खरंच काहीतरी "सोशल' करत असतो, याची प्रचिती नुकतीच आली आहे. याच सोशल मीडियामुळे हरवलेले रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट परत मिळाले आहे. 

चिंचणी (ता. सातारा) येथील युवक अथर्व खुरासणे यांचे पाकीट सातारा-मेढा रस्त्यावरील कण्हेर धरणाच्या कालव्याजवळ हरवले होते. सकाळच्या वेळी माळ्याचीवाडी गावचे जवान गणेश सदाशिव कोरडे हे त्याठिकाणी गेले असता त्यांना ते पाकीट सापडले. ते पाकीट त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या बंधूंकडे म्हणजे शिक्षक दत्ता कोरडे यांच्याकडे दिले. श्री. कोरडे हे प्राथमिक शिक्षक बॅंकेत संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पाकिटात असणाऱ्या पॅनकार्ड व आधारकार्डचा फोटो काढून लगलीच ते फोटो या परिसरातील "वेलकम फ्रेंड्‌स' या आपल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरली केले. त्यानंतर काही वेळातच या ग्रुपवरून माहिती मिळाली की, ते पाकीट चिंचणी येथील एका युवकाचे आहे. त्याच्याशी संपर्क साधून श्री. कोरडे व त्यांचे बंधू गणेश कोरडे यांनी हे पाकीट श्री. खुरासणे यांच्या ताब्यात दिले. या पाकिटात खुरासणे यांचे पॅनकार्ड, आधारकार्ड, दोन एटीएम, एका महाविद्यालयाचे ओळखपत्र, महत्त्वाची कागदपत्रे तसेच काही रोख रक्कमही होती. यावेळी प्रशांत सावंत, अथर्व खुरासणे आदी उपस्थित होते. श्री. कोरडे बंधूंच्या या प्रामाणिकपणाबद्दल माळ्याचीवाडीसह चिंचणी परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sataraः Return Of Lost Wallet Due To Social Media, Readiness Of Soldiers And Teachers