सातारा ः जवानांकडून "क्वारंटाइन'मध्येही आगळी कृतज्ञता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

विलगीकरणाच्या काळात शाळेच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा उपक्रम या तिघांनी सुरू केला असून, त्याचबरोबर विलगीकरण कक्ष, शाळेचा व्हरांडा पाण्याने रोज धुवून काढणे, संपूर्ण परिसराची झाडलोट करणे तसेच या ठिकाणच्या झाडांना हातपंपाचे पाणी घालणे असा दिनक्रम सुरू केला आहे. सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत हे काम करत आहेत. 

अंगापूर (जि. सातारा) ः वर्णे (ता. सातारा) गावातील तीन जवान चार दिवसांपूर्वी दिल्ली येथून गावात दाखल झाले आहेत. परंतु, घरी न जाता त्यांनी गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात स्वत: दाखल होऊन 14 दिवसांसाठी क्‍वारंटाइन करून घेतलेले असून, तेथे ते दररोज शाळेची स्वच्छता करून शाळेप्रती आगळी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. 

श्रीकांत पवार (सीआयएसएफ), अतुल यादव (बीएसएफ) व सागर बर्गे (आयटीबीएफ) हे तीन जवान महिन्याच्या हक्काच्या सुटीवर गुरुवारी (ता.21) दिल्ली येथून गावात आले. गावात येताच त्यांनी प्राथमिक शाळेत स्वत:ला 14 दिवसांसाठी विलगीकरण करून घेतले. प्रशासनाच्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करत मागील चार दिवसांपासून ज्या गावच्या 
प्राथमिक शाळेने आपल्याला उत्तम शिक्षण, संस्कार व समाजात वावरण्याची उत्तम जाण दिली, त्याच शाळेच्या ऋणातून उतराई होण्याची व कृतज्ञतेची संधी मिळाल्याचा भाव त्यांच्या मनी दिसून आला.

विलगीकरणाच्या काळात शाळेचा संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा उपक्रम या तिघांनी सुरू केला असून, त्याचबरोबर विलगीकरण कक्ष, शाळेचा व्हरांडा पाण्याने रोज धुवून काढणे, संपूर्ण परिसराची झाडलोट करणे तसेच या ठिकाणच्या झाडांना हातपंपाचे पाणी घालणे असा दिनक्रम सुरू केला आहे. सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत हे काम करत आहेत. दुपारी जेवणानंतर विश्रांती घेत आपल्या शालेय जीवनातील सवंगड्याच्या आठवणी काढत जुने दिवस आणि त्यावेळचे शिक्षक, शिक्षण व मौजमजा यांना उजाळा देत आपला वेळ व्यतित करत आहेत. विलगीकरण काळातील या आठवणी आम्हाला पुढील आयुष्यात निश्‍चितच प्रेरणा देत राहतील, असे या तिघांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara ः Extreme Gratitude In Quaranitine From The Soldiers