‘त्यांनी’ तेवत ठेवला सामाजिक बांधिलकीचा दिवा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण पैसा आणि मार्गदर्शनाअभावी अडू नये, गरीब व गरजू महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक सोसायटीच्या वतीने शेकडो महिला आणि विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची मदत केली जात असून, आजही हा सामाजिक बांधिलीचा दिवा सोसायटीने तेवता ठेवला आहे.

सातारा - समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण पैसा आणि मार्गदर्शनाअभावी अडू नये, गरीब व गरजू महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक सोसायटीच्या वतीने शेकडो महिला आणि विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची मदत केली जात असून, आजही हा सामाजिक बांधिलीचा दिवा सोसायटीने तेवता ठेवला आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकले असून, महिलाही स्वावलंबी होत आहेत.

सामाजिक जाणीव असणाऱ्या मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सन २००४ मध्ये सातारा एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्टची येथे स्थापना केली. दरवर्षी रमजानच्या काळात समाजासाठी निधी गोळा केला जातो. नागरिक निधी स्वेच्छेने जमा करतात. या निधीतूनच समाजातील शिकणारी गरजू मुले आणि स्वावलंबी होऊ पाहणाऱ्या महिलांना गरजेप्रमाणे मदत केली जाते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. लियाकत शेख, गणीभाई शेख, गुलाबभाई शेख, मजीद शेख, मुजफ्फर शेख, ए. बी. सय्यद, अलनसीर शेख, मुबारक मुल्ला, प्रा. मुजावर, खलील खान, इरफान शेख, फैय्याज सुतार, मायनॉरिटी फोरमचे जाकीर शिकलगार, आयुब बागवान, शफिख पठाण, प्रा. मोहम्मद अन्सारी असे मान्यवर कार्यकर्ते गरजूंना मदत करण्यासाठी सतत परिश्रम घेत असतात. बहुतेक कार्यकर्ते सेवानिवृत असून, सतत सामाजिक बांधिलकी जपत असतात.

आजवर संस्थेच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर दोन लाख रुपये बक्षीस देण्यात आले आहे. तर उच्च शिक्षणासाठी ३६ विद्यार्थ्यांना २४ लाखांची आणि शॉर्टटर्म कोर्ससाठी ३६७ विद्यार्थ्यांना तीन लाखांची मदत संस्थेने केल्याची माहिती प्रा. मुजावर यांनी दिली. तसेच ५६ विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांतून शैक्षणिक कर्ज (एक कोटी ८८ लाख रुपये) मिळावे, यासाठी निवृत्त बॅंक अधिकारी गुलाबभाई शेख यांनी मदत केली आहे. विविध कोर्ससाठी गरजू महिलांना सात लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच गरीब, विधवा महिलांना दोन लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने नुकत्याच झालेल्या सभेत देण्यात आली. संस्थेच्या मदतीतून अनेक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकले असून, केवळ सामाजिक बांधिलकीतून गरजूंना मदतीचे काम करत आहेत. अनेक महिलाही स्वावलंबी होत आहेत. नुकतीच संस्थेच्या वतीने स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावेळी सर्वांनी हे कार्य जोमाने पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Education Cultural Society Help Social Work Motivation