रुग्णाच्या निरोगी चेहऱ्यात त्यांचा ‘हर्ष’

विशाल पाटील  
सोमवार, 2 जुलै 2018

सातारा - अठराविश्‍व दारिद्य्र, त्यात टीबी... अचानक मेंदूवर सूज आल्याने महिला बेशुद्ध... त्याच अवस्थेत १३ दिवस उपचार केल्यानंतर महिला शुद्धीवर... दोन लहान मुलांचा सांभाळ करताना दवाखान्याचे बिल भरण्यास हाती कवडीही शिल्लक राहिलेली नाही... त्याचवेळी ‘सर्वांत आनंद बाई जगल्याचा झाला,’ असे म्हणत बिलही न घेऊन डॉक्‍टरातील ‘देवत्वा’चे दर्शन दिले. असे एक, दोन, तीन नव्हे तर असंख्य रुग्णांना अत्यल्प दरात, कधीकधी खिशातील पैसे खर्च करून उपचार केले जातात.

साताऱ्यातील सर्वपरिचित नाव म्हणजे डॉ. रवींद्र हर्षे. एम.डी. मेडिसीन शिक्षण घेतलेले डॉ. हर्षे साताऱ्यात १९७३ पासून वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत. केस पेपर, कटप्रॅक्‍टीस म्हणजे वैद्यकीय शिक्षणावरील खर्च काढण्यातील ‘राजमार्ग’. पण, त्यांनी तो अवलंबण्याचा केव्हाच विचार केला नाही. साताऱ्यासह कोरेगाव, जावळी, महाबळेश्‍वर, फलटण एव्हाना त्यांच्याकडे विटा, सांगली, भोर (पुणे) येथूनही रुग्ण येत असतात. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी किसन वीर यांच्यावर जितक्‍या आपुलकीने उपचार केले, तितक्‍याच आत्मियतेने ते गरीब रुग्णांवरही उपचार करतात. 

समाजवादी विचारसरणीचा प्रभाव असलेले डॉ. हर्षे यांचे काम ४५ वर्षे सुरू आहे. ‘मी आणि पत्नी दोघे राहत असून, आमची भाजी एकाच पेंडीत होते, पैशाने मिळणार नाही ते रुग्ण बरा झाल्याने समाधान मिळते,’ असे सांगणाऱ्या डॉ. हर्षेंनी कित्येक रुग्णांचे दवाखान्याचे बिल ५० ते ७० टक्‍के कमी केले आहे. ते गोरगरीबांवर ‘हृदया’पासून उपचार करतात, त्यामुळे त्यांच्याकडे उपचार घेणारा रुग्ण ‘थॅंक्‍यू डॉक्‍टर’ म्हटल्याशिवाय राहत नाही. 

सरकारी रुग्णालयाचा दुरुपयोग नाही
वैद्यकीय पेशात प्रवेश केल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय दवाखान्यांत सेवा दिली जाते. मात्र, पुन्हा त्याकडे मागे वळूनही पाहत नाहीत. मात्र, डॉ. हर्षेंनी सामाजिक बांधिलकी जपत तब्बल एक तप येथील जिल्हा रुग्णालयात ऑनररी रुग्णसेवा केली, तर आर्यांग्ल हॉस्पिटलमध्ये दहा वर्षे विद्यार्थ्यांना ऑनररी पध्दतीने शिकविले. अर्कशाळेवर ते २० वर्षे अध्यक्ष आहेत. त्यातील सर्वांत विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील एकही रुग्ण आपल्या खासगी दवाखान्याकडे वळविला नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara new Dr. ravindra Hershey MD