पाच मधुमेहींसाठी डॉक्‍टरच ‘इन्सुलिन’!

विशाल पाटील 
मंगळवार, 3 जुलै 2018

सातारा - तरुण वडिलांना ‘टाइप वन डायबेटी’स... कुटुंबिक आर्थिक दारिद्य्राने ग्रासलेले... त्यातच अवघ्या दीड वर्षाच्या मुलीला मधुमेह जडला... एकावरच खर्च करणे परवडत नाही... अशीच थोडीफार अवस्था असलेल्या पाच मुलांसाठी साताऱ्यातील एक डॉक्‍टर ‘इन्सुलिन’ बनला आहे. एवढेच नव्हे, तर तब्बल दहा वर्षांपासून १२० टाइप वन डायबेटीसग्रस्त मुलांची ते मोफत तपासणी करून वैद्यकीय पेशातील गोडवा जपत आहेत.

सातारा - तरुण वडिलांना ‘टाइप वन डायबेटी’स... कुटुंबिक आर्थिक दारिद्य्राने ग्रासलेले... त्यातच अवघ्या दीड वर्षाच्या मुलीला मधुमेह जडला... एकावरच खर्च करणे परवडत नाही... अशीच थोडीफार अवस्था असलेल्या पाच मुलांसाठी साताऱ्यातील एक डॉक्‍टर ‘इन्सुलिन’ बनला आहे. एवढेच नव्हे, तर तब्बल दहा वर्षांपासून १२० टाइप वन डायबेटीसग्रस्त मुलांची ते मोफत तपासणी करून वैद्यकीय पेशातील गोडवा जपत आहेत.

डॉ. जयदीप रेवले यांनी २००८ मध्ये प्रॅक्‍टीसला प्रारंभ केला. मधुमेही रुग्णांची तपासणी करताना त्यांच्याकडे ‘टाइप वन’ प्रकारातील १८ वर्षांखालील मुलेही उपचारासाठी येऊ लागली. कित्येकांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, विशेषत: हा मधुमेह मुलींना जास्त होत असल्याने त्यांच्यावर कशाला उपचार करायचे, अशी स्थितीही पाहण्यास मिळाली. भविष्यात त्या मुलांचा शिक्षण, नोकरी, विवाह अशा अनेक अडचणींनी त्यांचे भविष्य अंध:कारमय बनलेले रुग्ण भेटू लागले. डॉ. रेवले यांनी २००९ मध्ये या मुलांसाठी विशेष काम करण्याचे निश्‍चित केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नोवो नॉर्डिक्‍स ही कंपनी चेंजिंग डायबेटीस इन चिल्ड्रन (सीडीआयसी) या कार्यक्रमाखाली मधुमेहग्रस्त लहान मुलांसाठी काम करते. त्यांचे मोफत उपचार साताऱ्यासारख्या निमशहरी भागात मिळणे, हे दिव्य होते. तरीही डॉ. रेवलेंनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी हे उपचार साताऱ्यातील मुलांसाठी मिळविले. त्या माध्यमातून त्यांनी तब्बल १२० मधुमेहग्रस्त मुलांना इन्सुलिन मोफत मिळवून दिले. सध्या बॉटलमधील इन्सुलिन मिळत असून, ते इंजेक्‍शनद्वारे देताना मुलांना त्रास होतो. तो होऊ नये, म्हणून पेनद्वारे इन्सुलिन घेणे सोईस्कर असते. तो या मुलांना पेन मिळण्यासाठी डॉ. रेवले प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रत्येक मुलाचा दर महिना सुमारे ७०० रुपये खर्च कमी झाला आहे. 

दहा वर्षांपासून १२० मुलांची तपासणी, समुपदेशनाचे शुल्क घेत नाहीत. शिवाय, परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या पाच मुलांवर ते मोफत तपासणी, उपचार करत आहेत. त्यामध्ये खटाव तालुक्‍यातील एक मुलगी १८ वर्षांची असून, ती एका हाताने अपंग आहे. आई धुणी-भांडी, तर वडील किरकोळ कामे करतात. सात वर्षांपासून तेथील एक स्थानिक डॉक्‍टर तिला प्रवासाचा खर्च देतात, तर डॉ. रेवले मोफत उपचार करतात. ही मुले कुटुंबांसाठी आयुष्यभराची ‘बोजा’ झाली असताना रेवलेंच्या कृतज्ञतेपुढे ते ‘थॅंक्‍यू डॉक्‍टर’ म्हटल्याशिवाय राहत नाहीत. 

अडीच लाखांचा पंप देणार
परदेशातील एका कंपनीने ठिबक सिंचनप्रमाणे शरीराला इन्सुलिन देणारा अत्याधुनिक पंप तयार केला आहे. त्याची किंमत अडीच लाख असून, तो एका गरीब, गरजू मधुमेहग्रस्त मुलीला देण्याचा मानस डॉ. रेवले यांचा आहे. लहान मुलांचे आयुष्य बदलण्यासाठी त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news doctor diabetics Patient