esakal | जिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे जग; 'Whatsapp'च्या माध्यमातून गोळा केला तब्बल अडीच लाखांचा निधी

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

अडचणीच्या काळात श्रीराम यांचा मित्र परिवार रणसिंग कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावला आहे.

जिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे जग; 'Whatsapp'च्या माध्यमातून गोळा केला तब्बल अडीच लाखांचा निधी
sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : श्रीराम रणसिंग यांच्या निधनाला आता 15 दिवस होतील. ते आपल्यात नाहीत यावर आजही त्यांच्या मित्र परिवाराचा विश्वास बसत नाही. त्यांच्या आठवणीचा गंध अजूनही सर्वत्र दरवळताना दिसतो. आपल्या या लाडक्‍या मित्राच्या कुटुंबीयांसाठी "व्हॉट्‌सऍप'च्या केवळ एका पोस्टमधून आठवडाभरातच तब्बल अडीच लाखांचा निधी उभा राहिला आहे. 

श्रीराम शिवाजी रणसिंग (वय 35) या हरहुन्नरी शिक्षकाचे अलीकडेच अपघाती निधन झाले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ते समाजप्रिय, विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. मित्र परिवारातही ते तितकेच प्रिय होते. रणसिंग हे गारवडे (ता. पाटण) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत होते. ते मूळचे नगर जिल्ह्यातील चिखलीकर कोरेगाव (ता. श्रीगोंदा) येथील. त्यांची घरची परिस्थिती तशी जेमतेम. गावी वयोवृद्ध आई-वडील गावी असतात. दोघेही आता ऐंशीच्या घरात पोचले आहेत. त्यांची जबाबदारी रणसिंग यांच्यावर होती. सोबत पत्नी अन्‌ दोन मुले असा त्यांचा परिवार. रणसिंग यांच्या अकाली, आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. 

गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी साता-यात नागरिकांची गर्दी; क-हाडात 30 व्यापा-यांवर कारवाई 

रणसिंग हे 2005 नंतर सेवेत दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना शासनाच्या निवृत्ती योजनेचा लाभ नाही. सानुग्रह अनुदान योजनाही त्यांच्यासाठी लागू नाही. अशा अडचणीच्या काळात त्यांचा मित्र परिवार रणसिंग कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावला आहे. त्यानुसार "व्हॉट्‌सऍप'च्या माध्यमातून त्यांच्या मित्र परिवाराकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला समाजाच्या विविध स्तरांतून मोठा प्रतिसाद लाभला. केवळ आठवडाभरातच तब्बल अडीच लाख रुपयांचा निधी उभा राहिला आहे. त्यात शिक्षक, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरांवरील लोकांनी मदत केली. 

जिल्हाधिकारी साहेब! बगाड यात्रेतील धाेका टाळण्यासाठी बावधनसह वाड्यावस्त्यांवरील प्रत्येकाची काेराेनाची चाचणी करा 

मनमिळाऊ, सौजन्यशील अन्‌ सर्वांच्या मदतीसाठी तत्परतेने धावण्याचा स्वभाव ही रणसिंग सरांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यामुळेच मदतीचे आवाहन करताच सर्वच स्तरांतील लोक मदतीसाठी पुढे आले. जमा झालेला निधी लवकरच त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. 

-महेंद्र सावर्डेकर, समन्वयक, श्रीराम रणसिंग मित्रसमूह 

Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी 

"सकाळ'ची बातमी अन्‌ कविता 

रणसिंग यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी स्नेहभावना व्यक्त करणारी कविता "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती. "सर, तुमची रजा किती दिवस भरू?' ही ती कविता. कवितेतील शब्द वाचून सारेच गलबलून गेले. "सकाळ'ची ही बातमी अन्‌ त्यातील कविता "सोशल मीडिया'च्या माध्यमातून राज्यभर पोचली. रणसिंग यांच्याविषयी मदतीचे आवाहन करताना ही बातमी अन्‌ कविता त्यासोबत टॅग करण्यात आली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे