टोलनाका कर्मचाऱ्यांनी जपली बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

रिलायन्स व्यस्थापन व स्थानिक टोल व्यवस्थापनाकडून मोतलिंग यांच्या परिवाराला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पेन्शननसह भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. 
- अशोक सावंत, टोलनाका व्यवस्थापक, आनेवाडी

सायगाव - पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्‍यावर काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्र कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून (कै.) प्रमोद मोतलिंग यांच्या कुटुंबीयांना ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. मोतलिंग यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही मदतीचे आश्‍वासन त्यांनी दिले.

पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्‍यावर कळंबे (ता. वाई) येथील प्रमोद संपत मोतलिंग (वय ४८) यांचे भाऊबिजेदिवशी हृदयविकाराने निधन झाले. मोतलिंग कुटुंबातील कर्ता व्यक्तीच निघून गेल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात झाला होता. त्यांच्या मागे वयोवृद्ध आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याची जाणीव सहकारी कर्मचाऱ्यांना झाली. त्यामुळे टोलनाक्‍यावरील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या पगाराची ७५ हजार रुपयांची रक्कम देऊन मोतलिंग कुटुंबीयांना मदत केली. प्रमोद मोतलिंग हे गेल्या चार वर्षांपासून आनेवाडी टोलनाक्‍यावर काम करत होते. मोतलिंग यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासनही कर्मचारी अविनाश फरांदे, सुनील चोरगे, अमित साळुंखे, सचिन जाधव, किरण भोसले, स्वप्निल सोनावणे, मोहन जाधव यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी दिले. टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. टोकनाका व्यवस्थापन असलेल्या कंपनीनेही सामाजिक बांधिलकीतून मोतलिंग कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saygav satara news humanity