मृत्यूनंतर इतरांच्या आयुष्यात "प्रकाश'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

शहापुरातील भागवत कुटुंबाचा आदर्श; प्रकाश भागवत यांचे यकृत, डोळे दान

शहापुरातील भागवत कुटुंबाचा आदर्श; प्रकाश भागवत यांचे यकृत, डोळे दान
शहापूर - ब्रेन डेड झालेल्या शहापूरमधील प्रकाश भागवत यांचा मंगळवारी (ता. 13) सोलापूरमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी यकृत आणि दोन डोळे दान करण्याचा निर्णय घेऊन तिघांच्या आयुष्यात "प्रकाश' निर्माण केला आहे. आयआरबी कंपनीत भागवत हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. सोलापूर-औरंगाबाद या रस्त्याच्या कामाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

प्रकाश भागवत यांना शनिवारी (ता. 10) अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूच्या अर्ध्या भागाला रक्तपुरवठा होत नसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या नियंत्रणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर डॉक्‍टरांनी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे नातेवाइकांना सांगितले. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी सकाळी डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. भागवत यांची बहीण विद्या आणि मेव्हणे मेघनाद जयतापकर, भाऊ मोरेश्‍वर, त्यांचा साडू राजेंद्र चौधरी या नातेवाइकांनी प्रकाश यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर यकृत आणि दोन डोळे दान करण्यात आले. त्यामुळे प्रकाश यांनी मृत्यूनंतर तीन जणांचे आयुष्य प्रकाशमान केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shahapur news mumbai news prakash bhagwat organ donate