मिटवुनी अंधार केले तेजोमय घरदार...

मिटवुनी अंधार केले तेजोमय घरदार...

मालवण - ग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हस आणि जाणीव यांच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येस पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सौरदिवे लावून ‘मिटवुनी अंधार करू तेजोमय घरदार’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्‍यातील काष्टी आणि पाचघर या गावांमधील ५० गरजू कुटुंबांच्या घरामध्ये सौरदिवे बसविण्यात आले आणि दिवाळीमध्ये येथील आदिवासींना या संस्थांनी अनोखी भेट दिली. 

ग्लोबल मालवणीचे अध्यक्ष सचिन आचरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना शहरापेक्षा गावात माणुसकीचे दर्शन जास्त घडते, तुम्ही मनाने श्रीमंत आहात आणि गावही सुंदर आहे, ते असेच सुंदर आणि स्वच्छ ठेवा, असा संदेश दिला. लाईटनिंग लाईव्हसचे अमित सिंघ आणि कृपा चतुर्वेदी यांनी गावकऱ्यांशी मराठीत संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. गावात सातवीपर्यंतच शाळा असल्याने आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी जवळपास आठ किलोमीटर चालत जावे लागत असल्याने विशेषतः मुलींचे शिक्षण बंद होते. घरातील स्त्री शिक्षित असेल तर मुलांना ती शिकवू शकते, असा विश्वास या वेळी दिला. सौर दिव्याचा प्रकाश केवळ घरात नाही, तर डोक्‍यात पडायला हवा.

पाचघर गावातील शाळेचे शिक्षक श्री. वाघमारे यांनी जाणीव संस्थेचे गावकऱ्यांशी असलेले ऋणानुबंध विशद केले. त्यानंतर योगेश बोराडे यांनी सहज सोप्या भाषेत सौर दिव्याचा वापरासंबंधी प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दिले. काष्टी गावातील गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.

या वेळी गावातील एका छोट्या छाया नावाच्या मुलीने म्हटलेले गाणे उपस्थितांची दाद घेऊन गेले. या वेळी पाचघर शाळेच्या मुलांनी लाकडापासून बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शाळेच्या वतीने ठेवले होते. त्या लाकडापासून बनविलेल्या वस्तूमधून त्या मुलांमध्ये असलेल्या कौशल्याची जाणीवही सर्वांना झाली. जाणीव संस्थेचे मनोज पांचाळ यांनी प्रास्ताविक केले. सुख देवाण-घेवाण मधून मिळते, जसे की तुम्ही गरजवंत आहात म्हणून ग्लोबल मालवणी आणि लाईटनिंग लाईव्हसचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत मदत पोचवू शकले आणि जाताना आपल्या सोबत तुमचे आशीर्वाद घेऊन जाणार आहेत अशा भावना व्यक्त केल्या.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जवळपास १०० पेक्षा जास्त जणांनी आर्थिक हातभार लावला. ग्लोबल मालवणीचे सदस्य प्रफुल्ल मोरे, उत्तम मयेकर, अभिषेक मुणगेकर, विजय पांचाळ, श्रुती उरणकर, शर्मिला केसरकर, संजय चव्हाण, रंजन रेवंडकर, नीलेश वालकर,गणेश गावडे, वसंत परब, संदीप सुतार आणि डॉ. प्रसाद गोलतकर तर लाईटनिंग लाईव्हसच्या वतीने रोशनी गुप्ता, अमित सिंघ, रश्‍मी चतुर्वेदी, योगेश बोराडे, अंकिता दळवी, कृपा शुक्‍ला, प्रतीक जानी, तृप्ती कदम यांचे सहकार्य लाभले. मनोज पांचाळ यांनी ग्लोबल मालवणीचे अध्यक्ष सचिन आचरेकर आणि लाईटनिंग लाईव्हसचे योगेश बोराडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com