वेदनेने जाणल्या वेदनेच्या कळा!

अनुराधा धावडे
सोमवार, 18 जून 2018

पुणे - त्याचं गाव दुष्काळीच. पावसाला दया आली तरच मातीतून पसाभर धान्य निघायचं. ते नाही पिकलं तर कोणी गळ्याला फास लावून घ्यायचं, तर कोणी गाव सोडून जायचं. हातांना मिळेल ते काम करून मोडकातोडका संसार सावरण्याची धडपड करायची...पिढ्यान पिढ्यांच्या या वेदनेतूनच त्याच्यात समाजसेवेने जन्म घेतला. त्यातूनच गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून तो दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त मुलांचा पालनकर्ता बनला. आज घडीला अशा चाळिसांवर मुलांना तो स्वतःच्या घरात शिकवतोय...घडवतोय...त्यांना जगण्याची उमेद देतोय.

अशोक देशमाने असं या पालनकर्त्याचं नाव. अवघ्या तिशीतला हा तरुण. मूळ परभणीच्या असलेल्या अशोक यांनी लहानपणापासूनच दुष्काळाची दाहकता अनुभवलीय. दुष्काळानं किती संसारांचं होत्याचं नव्हतं झालं, हे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. त्या वेदनेच्या कळा सोसतच त्यांनी एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतलं. पुण्यात चांगली नोकरी लागली; पण ती वेदना त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यातच त्यांची एकदा डॉ. प्रकाश आमटे यांची भेट झाली. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी, दुष्काळग्रस्तांच्या मुलांसाठी काही तरी करावं, या विचारातून त्यांनी नोकरी सोडली. भोसरी येथील स्वतःच्या घरातच त्यांनी स्नेहवन ही संस्था सुरू केली.   

मराठवाडा, विदर्भातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या मुलांना अशोक यांनी भोसरीत आणले. सुरवातीच्या २५ मुला-मुलींचा हा आकडा चाळीसच्या वर गेला आहे. मुलांचा सर्व खर्च देणगीतूनच भागवला जातो, असं अशोक सांगतात. या मुलांना शिक्षणाबरोबरच संगीत, चित्रकलेचेही धडे दिले जातात. त्यांच्यासाठी दोन हजार पुस्तकांचे ग्रंथालयही आहे. 

हा ‘संसार’ सांभाळण्यात अशोक यांना मोलाची साथ आहे ती पत्नी अर्चना यांची. दोन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकलेलं हे दांपत्य या मुलांसाठी मातापिताच बनलं आहे.

मी दोन वर्षांपूर्वी स्नेहवनमध्ये आलो. गावाकडे दुष्काळामुळे आर्थिक परिस्थिती बेताची होती. अशोकदादा मला इथे घेऊन आल्यापासून माझ्या शिक्षणाची सोय झाली.  
- राम दौलतराव मगर, परभणी (‘स्नेहवन’मधील विद्यार्थी)

Web Title: snehwan organisation children life drough affected child