आवाजाच्या दुनियेतले चमचमणारे छोटे तारे 

- नीला शर्मा 
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

आदिती केसकर, समृद्धी पटेकर, राधिका व साहिल दातार यांनी मालिका, चित्रपट, ध्वनिचित्रफिती व नभोवाणीसाठी गायन किंवा संवादाच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू पसरविली आहे. सूर, ताल व स्पष्ट शब्दोच्चारांचं महत्त्व अनुभवानंच लक्षात येत गेलं. आपल्याच चुकांमधून आपण कसे शिकत गेलो तेही या कलावंतांनी सांगितलं. 

आदिती केसकर, समृद्धी पटेकर, राधिका व साहिल दातार यांनी मालिका, चित्रपट, ध्वनिचित्रफिती व नभोवाणीसाठी गायन किंवा संवादाच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू पसरविली आहे. सूर, ताल व स्पष्ट शब्दोच्चारांचं महत्त्व अनुभवानंच लक्षात येत गेलं. आपल्याच चुकांमधून आपण कसे शिकत गेलो तेही या कलावंतांनी सांगितलं. 

आदिती केसकरनं पाच वर्षांची असताना एका वर्षाच्या बालकासारखा आवाज काढण्याची मागणी कशी पुरवली होती, ती गंमत आता तेरा वर्षांची झाली तरी तिच्या लक्षात आहे. ती म्हणाली, ""छोटं मूल मोठं होतानाचे टप्पे त्या चित्रफितीतून, त्या-त्या वयाच्या मुलाच्या आवाजातून सांगायचे होते. खूप मजा आली. मग माझ्या आवाजाचा वापर कसा वेगवेगळ्या पद्धतीनं करता येईल याचा विचार माझ्या डोक्‍यात सुरू झाला. नंतर गाण्यांचे आल्बम्स करण्याच्या संधी मिळू लागल्यावर माझ्या आवाजातलं नावीन्य सापडायला लागलं. "ढॉंसू जासूस', "जय श्रीकृष्ण' या मालिका व पाच-सहा आल्बम्ससाठी मुलांची गाणी गाताना यातच करिअर करावंसं वाटू लागलं.'' 
राधिका दातार आकाशवाणीवरील सामाजिक श्रुतिकांमधील निरनिराळ्या भूमिका निभावताना आवाजाच्या दुनियेच्या प्रेमात पडत गेली. ती आवर्जून सांगते, की "आता बारावीत आल्यावर मला असं वाटतंय की, आपण साउंड इंजिनिअर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.' तिचा धाकटा भाऊ साहिलही तिचं पाहून स्वत:च्या आवाजाबाबत जागरूक झाला आहे. ताईबरोबर काही बालगीतांसाठी कोरसमध्ये सहभागी होण्याची मौज अधूनमधून त्यालाही अनुभवायला मिळते. 

समृद्धी पटेकर ही नववीतली मुलगी शास्त्रीय व सुगम गायनाच्या विविध स्पर्धांमध्ये खूप तयारी करून भाग घेत असते. शास्त्रीय व सुगमसाठी आवाजाचा लगाव कसा भिन्न असावा लागतो, हे ती मैत्रिणींना वेळोवेळी सांगत असते. ती म्हणाली, ""आपण रंगमंचावर आहोत की स्टुडिओमध्ये, त्यानुसार माइकवरील आवाजाचा परिणाम बदलत असतो. दोन्हींसाठी कोणती काळजी घ्यायला हवी, ते मी जाणकारांकडून शिकत असते.'' 
या सर्व कलावंतांना एकंदरीतच रेकॉर्डिंग व त्यानंतरच्या एडिटिंगमध्येही खूप रस निर्माण झाल्याचं त्यांच्या बोलण्यात आलं. आवाजाच्या दुनियेत आपला आगळा वेगळा ठसा उमटविण्यासाठी हे छोटे तारे सज्ज होत आहेत. 

Web Title: The sound world of small stars

टॅग्स